मुंबई : महाराष्ट्राच्या पुरुष संघाने शनिवारी केरळला ४८-३० असे सहज पराभूत करीत ६९व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. रविवारी सकाळी महाराष्ट्राचा चंडीगडशी उपांत्यपूर्व सामना होणार आहे.

चरखी दादरी (हरयाणा) येथील बंदिस्त क्रीडा संकुलातील मॅटवर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने चौथ्या मिनिटालाच लोण देत सामन्यावरील पकड घट्ट केली. मग पहिल्या सत्रात दोन लोण देत २९-१२ अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला. नंतर उत्तरार्धात आणखी एक लोण देत आपला विजय निश्चित केला. अस्लम इनामदार आणि आकाश शिंदे यांच्या दमदार चढायांना महाराष्ट्राच्या विजयाचे श्रेय जाते. डावा कोपरारक्षक किरण मगर आणि डावा मध्यरक्षक अक्रम शेख यांनी अप्रतिम पकडी करीत केरळच्या आक्रमणाची धार बोथट केली. अन्य उपांत्यपूर्व सामन्यात चंडीगडने बिहारला ५७-४८ असे नामोहरम केले, तर भारतीय रेल्वेने पंजाबला ४९-३० अशी धूळ चारली. याचप्रमाणे हरयाणाने राजस्थानचा ४८-२४ असा पराभव केला.