अ‍ॅना इव्हानोव्हिकचे आव्हान संपुष्टात
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजयासाठी संघर्ष करावा लागला. क्रिस्तिना लाडेनोव्हिकला नमवत सेरेनाने चौथी फेरी गाठली. अनुभवी खेळाडू अ‍ॅना इव्हानोविक व डॉमिनिका सिबुलकोव्हा यांना पराभवाचा धक्का बसला. शनिवारच्या सामन्यांचे वेळापत्रक पावसाच्या व्यत्ययामुळे कोलमडले. जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या सेरेनाने क्रिस्तिनावर ६-४, ७-६ (१२-१०) असाजिंकला. कार्ला सुआरेझ नवारोने सिबुलकोवाचा ६-४, ३-६, ६-१ असा पराभव केला. एलिना स्वितोलिनने इव्हानोव्हिकचे आव्हान ६-४, ६-४ असे संपुष्टात आणले. व्हीनस विल्यम्सने अ‍ॅलिझ कॉर्नेटवर ७-६ (७-५), १-६, ६-० अशी मात केली.
पुरुषांमध्ये डेव्हिड फेररने फेलिसिआनो लोपेझचा ६-४, ७-६ (८-६), ६-१ असा पराभव केला. अर्नेस्ट गुलबिसविरुद्ध खेळताना दुखापतीमुळे जो विलफ्रेड सोंगाने माघार घेतली.
पेस-हिंगिस उपांत्यपूर्व फेरीत
लिएण्डर पेसने मार्टिना हिंगिसच्या साथीने खेळताना मिश्र दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. पेस-हिंगिस जोडीने चौथ्या मानांकित फ्लोरिन मर्गेआ आणि यारोस्लाव्हा श्वेडोव्हा जोडीवर २-६, ७-५, १०-६ असा विजय मिळवला. तीन ग्रँड स्लॅम जेतेपदे नावावर असणाऱ्या या जोडीने फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या पहिल्यावहिल्या जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.