अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला भलेही फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या विजेतेपदाने हुलकावणी दिली, मात्र श्रीमंत महिला खेळाडूंच्या यादीत तिने अग्रस्थान मिळवले आहे.

‘फोर्ब्स’ नियतकालिकाने श्रीमंत महिला खेळाडूंची यादी जाहीर केली असून, यात सेरेनाने टेनिसपटू मारिया शारापोव्हाला मागे टाकले आहे. तिने गेल्या वर्षभरात दोन कोटी ८९ लाख डॉलरची कमाई केली आहे. गेली ११ वर्षे शारापोव्हाने अग्रस्थान राखले होते. मात्र उत्तेजक सेवनाची कबुली दिल्यामुळे तिच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

सेरेनाने २००२मध्ये दुसरे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवल्यानंतर आतापर्यंत १९ ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवली आहेत. सेरेनाने कारकीर्दीत आजपर्यंत सात कोटी ७६ लाख डॉलरची कमाई केली आहे. अन्य महिला खेळाडूंपेक्षा तिने दुपटीने उत्पन्न मिळवले आहे. मात्र जाहिरात व मॉडेलिंगचा विचार करता शारापोव्हाने वर्चस्व गाजवले आहे.