फॅशन शोमध्ये नारीशक्ती दर्शवणाऱ्या कवितेचे वाचन

ती तिच्या नैराश्याचे विजयात रूपांतर करते,

..आणि दु:खाचे आनंदात,

नकारसुद्धा होकारात बदलतो,

तिच्यावर कुणी विश्वास ठेवला नाही,

त्यामुळे तिला फरक पडला नाही,

तिचा स्वत:वर विश्वास आहे,

तिला कुणीही अडवू शकत नाही,

तिची उंचीही कुणी गाठू शकत नाही,

ती एक महिला आहे..

टेनिसपटू सेरेना विल्यम्सने लिहिलेली ही कविता. मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या फॅशन शोमध्ये या कवितेचे जाहीर वाचन करून तिने नारीशक्तीचे दर्शन घडवले. टेनिस कोर्टवर हुकूमत गाजवणाऱ्या सेरेनाचे एक वेगळे रूप सर्वासमोर आले.

‘‘विम्बल्डन स्पध्रेनंतर लगेचच आणि ऑलिम्पिक स्पध्रेदरम्यान मी या कवितेचे लिखाण केले. महिलांना सक्षम करण्यासाठी ही कविता लिहिली आहे. सर्वोत्तम महिला खेळाडू झाल्याबद्दल कसे वाटते? हा प्रश्न मला योग्य वेळी विचारला. हा प्रश्न पुरुषांना कुणी विचारत नाही. महिलांना मला ताकद द्यायची आहे. बेयॉसी लेमोनाडेसह मी या कवितेचे वाचन केले आणि तिला ती आवडली,’’ असे सेरेना म्हणाली.