India W vs Bangladesh W: महिला आशिया चषक २०२६ स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १४९ धावांचा डोंगर उभारला. यादरम्यान शफाली वर्माने दमदार अर्धशतक झळकावत ४० चेंडूंमध्ये ६४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने स्मृती मानधनाचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
शफाली वर्मा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखली जाते. या सामन्यात तिला ३ वेळ जीवदान मिळालं. डावातील दुसऱ्याच षटकात सीमारेषेवर सोपा झेल सुटला. त्यावेळी ती ६ धावांवर फलंदाजी करत होती. त्यानंतर पुन्हा एकदा संधी मिळाली, त्यावेळी ती ११ धावांवर होती. या संधीचा फायदा घेत तिने अर्धशतक पूर्ण केलं. यादरम्यान तिने महिलांच्या आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करून स्मृती मानधनाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
महिलांच्या आशिया चषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
शफाली वर्माने या सामन्यात फलंदाजी करताना स्मृती मानधनाचा सर्वात मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे. महिलांच्या आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत शफाली वर्मा अव्वल स्थानी पोहोचली आहे. शफालीने या स्पर्धेतील २० डावात ५९३ धावा केल्या आहेत. याआधी हा रेकॉर्ड स्मृती मानधनाच्या नावे होता. स्मृतीने १८ डावांत ५९० धावा केल्या होत्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौरने १८ डावांत ४६५ धावा केल्या आहेत. तर जेमिमा रॉड्रिग्जने १६ डावात ३४५ धावा आणि ऋचा घोषच्या नावे १७ डावात २३१ धावा करण्याची नोंद आहे.
महिलांच्या आशिया चषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फंलदाज
शफाली वर्मा- २० डावात ५९३ धावा
स्मृती मानधना- १८ डावात ५९० धावा
हरमनप्रीत कौर- १८ डावात ४६५ धावा
जेमिमा रॉड्रिग्ज – १६ डावात ३४५ धावा
ऋचा घोष- १७ डावात २३१ धावा
