Shafali Verma World Record INDW vs SAW WC Final: महिला विश्वचषक २०२५ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जात आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवल्या जात असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. स्मृती मानधना व शफाली वर्मा यांनी डावाची चांगली सुरूवात करत भारताच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी रचली. यासह शफाली वर्माने मोठा विश्वविक्रम रचला आहे.
भारताच्या वर्ल्डकप संघाचा भाग नसतानाही अचानक मिळालेल्या संधीचं सोनं करत शफाली वर्माने फायनलमध्ये भारतासाठी वादळी खेळी केली. भारताची सलामीवीर प्रतिका रावलला दुखापत झाल्याने तिच्या जागी शफाली वर्माला संधी मिळाली. वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करत शफालीने अंतिम सामन्यात महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावलं आहे.
उपांत्य फेरीत धावा करण्यात शफाली अपयशी ठरली पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात, २१ वर्षीय शफालीने आक्रमक फलंदाजी करत धावा केल्या. शफालीने या सामन्यात चौकार-षटकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण अर्धशतक झळकावलं. तर ८७ धावांवर बाद झाल्याने शफालीचं अर्धशतक हुकलं.
पावसामुळे अंतिम सामना दोन तास उशिरा सुरू झाल्यामुळे प्रथम फलंदाजी करणं कठीण असेल असं वाटत होतं, परंतु शेफालीने क्रीजवर येताच चौकार-षटकारांचा पाऊस सुरू केला. उपांत्य फेरीत फक्त १० धावांवर बाद झालेल्या शफालीने यावेळी आक्रमक फलंदाजी करत फक्त ४९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. यासह विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतकी खेळी करणारी शफाली सर्वात तरूण फलंदाज ठरली.
शफाली वर्माने ७८ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ८७ धावांची खेळी केली. शफालीचं अंतिम सामन्यातील अर्धशतक महत्त्वाचं होतं, कारण ३ वर्षांनी तिने वनडेमध्ये अर्धशतकी खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शफालीने तीन वर्षांहून अधिक काळानंतर या फॉरमॅटमध्ये अर्धशतक झळकावलं. तिचं अखेरचं अर्धशतक जुलै २०२२ मध्ये पाहायला मिळालं होतं.
शेफाली विश्वचषक अंतिम सामन्याच्या इतिहासात अर्धशतक झळकावणारी सर्वात तरुण फलंदाज (पुरुष किंवा महिला) ठरली. तिने केवळ २१ वर्षे आणि २७८ दिवस वय असताना हा विश्वविक्रम केला. इतकंच नाही तर, विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतक झळकावणारी ती तिसरी भारतीय सलामीवीर ठरली. २००३ च्या पुरुष विश्वचषकात वीरेंद्र सेहवागने पहिलं अर्धशतक झळकावलं होता. त्यानंतर, २०१७ च्या महिला विश्वचषकात पूनम राऊतनेही अर्धशतक झळकावलं. आता शफालीदेखील या यादीत सामील झाली आहे.
