Shafali Verma World Record India vs Pakistan Women Asia Cup 2026: महिलांच्या आशिया चषक २०२६ मध्ये पाकिस्तानविरूद्ध सामन्यात शफाली वर्माने इतिहास घडवला. पाकिस्तानला ७ विकेट्सने सहज पराभूत करत भारतीय महिला संघाने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला. शफालीने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत संघाला दणक्यात सुरूवात करून दिली. पण १२ धावा करत ती झेलबाद झाली. पण या १२ धावांच्या छोट्या खेळीत तिने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत, ज्यामध्ये २ वर्ल्ड रेकॉर्डचा समावेश आहे.

भारतीय संघाची स्टार सलामीवीर शफालीने डावाची सुरुवातच सादिया इक्बालच्या पहिल्या चेंडूवर षटकार खेचत केली. विशेष म्हणजे, शफालीने महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वीही तिने पाकिस्तानविरुद्धच ही कामगिरी केली होती. २०२६ महिला टी-२० विश्वचषकातील एजबस्टन येथे झालेल्या सामन्यात तिने पुन्हा सादिया इक्बालच्याच गोलंदाजीवर डावातील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. या कामगिरीसह महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकापेक्षा अधिक वेळा षटकार ठोकणारी शेफाली वर्मा ही पहिलीच खेळाडू ठरली आहे.

शफाली वर्माचा ३००० हजार धावांसह वर्ल्ड रेकॉर्ड

शफाली वर्माने पाकिस्तानविरूद्ध सामन्यात महिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला. या कामगिरीसह तिने टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ३ हजार धावा पूर्ण करणारी सर्वात कमी वयाची खेळाडू होण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला. २२ वर्षीय शेफालीने आयर्लंडच्या गॅबी लुईसचा विक्रम मोडला.

विशेष म्हणजे, शफाली वर्माने पुरुष टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विक्रमही मागे टाकला आहे. पुरुषांमध्ये शफालीपेक्षा कमी वयात ३ हजार टी-२० आंतरराष्ट्रीय धावा करणारा एकही खेळाडू नाही. पुरुषांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम मलेशियाच्या विरानदीप सिंगच्या नावावर आहे. त्याने २६ वर्षांच्या वयात हा टप्पा गाठला होता.

महिला टी-२०मध्ये ३ हजार धावांचा टप्पा गाठणाऱ्या सर्वात युवा खेळाडू

शफाली वर्मा (भारत) – २२ वर्षे २२० दिवस
गॅबी लुईस (आयर्लंड) – २४ वर्षे २४७ दिवस
ईशा ओझा (युएई) – २७ वर्षे १३९ दवस
स्मृती मानधना (भारत) – २७ वर्षे १७१ दिवस
हिली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज) – २७ वर्षे ३४७ दिवस

शेफाली वर्माने केवळ २३२१ चेंडूंमध्ये ३ हजार टी-२० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केला. सर्वात कमी चेंडूंमध्ये ३ हजार धावांचा पल्ला गाठणारी शेफली महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाची दिग्गज फलंदाज एलिसा हिली हिच्या नावावर होता.

शफाली वर्माने स्मृती मानधना, हरमनप्रीत कौरला मागे टाकलं

शफाली वर्मा ही उपकर्णधार स्मृती मानधना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरनंतर ३ हजार टी-२० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठणारी तिसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. मात्र, या दोन्ही दिग्गजांना मागे टाकत तिने भारतासाठी आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

शफालीने केवळ ११३ डावांमध्ये ३ हजार धावा पूर्ण केल्या आणि ती या टप्प्यावर पोहोचणारी सर्वात वेगवान भारतीय महिला खेळाडू ठरली. यापूर्वी हा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर होता. स्मृतीने डिसेंबर २०२३मध्ये नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १२२ डावांमध्ये ३ हजार टी-२० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या होत्या.