Shaheen Afridi Viral Video: पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीग PSL स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात काहीना काही घडतंय. टी-२० क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनवले जातात. पण पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेतील सामन्यांमध्ये अशा काही घटना घडतात, ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या लाहोर कलंदर्स संघाला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या हंगामातील ६ पैकी अवघ्या २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. दरम्यान क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात बाद होऊन मैदानाबाहेर जात असताना, त्याने असं काही केलं ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रागात बॅट तोडली

शाहीन आफ्रिदीला नेतृत्वासह गोलंदाजीतही हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याला केवळ १ गडी बाद करता आला. या सामन्यात फलंदाजी करत असतानाही तो स्वस्तात माघारी परतला. उस्मान तारीकच्या गोलंदाजीवर तो शून्यावर माघारी परतला. बाद झाल्यानंतर त्याने असं काही केलं, ज्याचा कोणी विचारही केला नसेल. बाद होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना, तो संताप व्यक्त करताना दिसून आला. त्याने रागात बॅट जोरात आपटली. त्यानंतर ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवरही जोरात बॅट आपटली. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लाहोर कलंदर्स आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात झालेल्या सामन्यात उस्मान तारिकने दमदार गोलंदाजी केली. त्याने ४ षटक गोलंदाजी केली आणि १८ धावा खर्च करून ३ गडी बाद केले. यादरम्यान त्याने शाहीन आफ्रिदी, सिकंदर रजा आणि अब्दुल्लाह शफीकला बाद करत माघारी धाडलं. तसेच अल्जारी जोसेफने २ आणि जहांदाद खानने ३ गडी बाद केले. पहिल्या डावात फलंदाजी करताना लाहोर कलंदर्सला अवघ्या ३४ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या क्वेटा ग्लॅडिएटर्स संघाने हे आव्हान १६.२ षटकात पूर्ण केलं.

लाहोर कलंदर्स संघाला या स्पर्धेत आतापर्यंत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. आतापर्यंत लाहोर कलंदर्स संघाने ६ सामने खेळले आहेत. यापैकी अवघ्या २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ४ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या लाहोर कलंदर्सचा संघ गुणतालिकेत ७ व्या स्थानी आहे. तर पेशावर जाल्मी संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या संघाने ७ सामने खेळले असून एकही सामना गमावलेला नाही. १ सामना पावसामुळे रद्द झाला होता. सध्या हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.