Basit Ali On Babar Azam Shaheen Afridi Rift: पाकिस्तान क्रिकेट संघात सध्या भूकंप झालेला पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून संघातील ७ खेळाडूंना रिलीज करण्यात आलं आहे. यादरम्यान कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद व गोलंदाजी कोच यांची हकालपट्टी केली. यानंतर आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूने शाहीन आफ्रिदी व बाबर आझम यांच्यातील मतभेदामुळे पाकिस्तान संघाची घसरण झाल्याचं म्हटलं आहे.
माजी पाकिस्तानी फलंदाज बासित अलीच्या वक्तव्यानंतर बाबर आझमच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील घसरणीसाठी बाबर आणि शाहीन शाह आफ्रिदी यांच्यातील मतभेद कारणीभूत असल्याचा दावा बासित अलीने केला आहे. कर्णधारपदावरून दोघांमध्ये झालेल्या वादाचा पाकिस्तान क्रिकेटवर विपरीत परिणाम झाल्याचंही त्याने म्हटलं.
पाकिस्तानला लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडविरुद्ध १९४ धावांनी दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बासित अलीने हे धक्कादायक वक्तव्य केलं. या पराभवामुळे पाकिस्तान तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत ०-२ ने पिछाडीवर आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांतील पाकिस्तानच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात टीका होत असून, जो रूटच्या संघाविरुद्ध पाकिस्तानी खेळाडूंमध्ये झुंज देण्याची वृत्तीच दिसली नाही, अशी टीका केली जात आहे.
‘गेम प्लॅन’ या कार्यक्रमात बोलताना बासित अली म्हणाला, “बाबर आझम हा मजबूत कर्णधार नाही. मी हे इंग्लंडमधील कामगिरीच्या आधारावर बोलत नाही. त्याने अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. पाकिस्तान क्रिकेटच्या घसरणीचं मुख्य कारण म्हणजे शाहीन आणि बाबर यांच्यातील मतभेद. कर्णधारपदावरून दोघांमध्ये वाद झाला, त्याच दिवशी पाकिस्तान क्रिकेट उद्ध्वस्त झालं.”
तो पुढे म्हणाला, “याबाबत अनेक वक्तव्यं करण्यात आली की शाहीन खूप चांगला गोलंदाज आहे आणि बाबरही खूप चांगला खेळाडू आहे. हा मतभेद ज्याने कोणी निर्माण केला, त्याचे दुष्परिणाम आता पाहायला मिळत आहेत.”
२०२४ टी-२० विश्वचषकात पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यात अपयश आल्यानंतर बाबर आझमला पुन्हा एकदा टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर पाकिस्तानने तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार नियुक्त करण्याची पद्धत स्वीकारली. बाबरकडे कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली, शाहीन शाह आफ्रिदीकडे वनडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं, तर सलमान अली आघा टी-२० संघाचा कर्णधार झाला
लॉर्ड्स कसोटीतील पराभवानंतर PCBने पुन्हा मोठे बदल केले. मोहम्मद रिझवान आणि सलमान अली आघासह तब्बल सात खेळाडूंना मायदेशी परत पाठवण्यात आलं. तसेच, कसोटी संघाचे प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनाही त्यांच्या पदांवरून हटवण्यात आलं. पाकिस्तानचा व्हाइट-बॉल संघाचे प्रशिक्षक माइक हेसन आता इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत संघाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
