Shaheen Afridi Umar Gul Argument Video: पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सिल्हेटमध्ये खेळवला जात आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या विजयानंतर बांगलादेशने दुसऱ्या सामन्यावरही आपली पकड अधिक मजबूत केली आहे. पाकिस्तानचा संघ मैदानात असणार आणि वाद होणार नाही, अशा घटना फार कमी पाहायला मिळतात. आता पाकिस्तानच्या संघातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. शाहीन शाह आफ्रिदी मैदानावर कोचशी वाद घालताना दिसला.
बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी मैदानावर घडलेल्या घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, सिल्हेटच्या मैदानावर सीमारेषेजवळ शाहीन आफ्रिदी आणि पाकिस्तानी संघाचे नवीन गोलंदाजी प्रशिक्षक, उमर गुल यांच्यात बाचाबाची झाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बांगलादेशविरुद्धच्या या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत, पाकिस्तानी संघाला पहिल्या सामन्यात मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. यानंतर, पाकिस्तानने दुसऱ्या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले, शाहीन आफ्रिदीला वगळून त्याच्या जागी खुर्रम शहजादला संधी दिली.
शाहीन आफ्रिदी-उमर गुल यांच्यात कशावरून झाला वाद?
पाकिस्तानी संघ त्यांच्या पहिल्या डावात फलंदाजी करत असताना, फलंदाजांना पाणी देण्याच्या बहाण्याने एक मेसेज देण्यासाठी शाहीन आफ्रिदीला मैदानावर पाठवण्यात आलं. परत आल्यावर, गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांनी त्याला परत येऊन आणखी एक मेसेज देण्यास सांगितलं. यानंतर, शाहीनच्या प्रतिक्रियेवरून असं वाटत होतं की त्याला पुन्हा जायचं नव्हतं आणि उमर गुलने असं आदेश देणं त्याला आवडलं नव्हतं.
उमर गुल शाहीन आफ्रिदीला काहीतरी समजावून सांगत असताना, शाहीनने डोक्याला हात लावून तिथे उभ्या असलेल्या मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद यांच्याकडे इशारा केला. उमर गुलने शाहीनला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण शाहीन त्याचा हात झटकून ड्रेसिंग रूमच्या दिशेने पुढे गेला. सरफराज अहमद लगेच आला आणि उमर गुलशी चर्चा करताना दिसला. शाहीन आफ्रिदीच्या या वागण्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पहिल्या कसोटीतील पराभवानंतर, शाहीन आफ्रिदी आणि पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूद यांच्यातही ड्रेसिंग रूममध्ये जोरदार वाद झाला होता, असी बातमी समोर आली होती. दोघांनीही पराभवासाठी एकमेकांना दोष दिला, अशी माहितीही यामध्ये समोर आली होती. दरम्यान पहिल्या कसोटीतील स्लो ओव्हर रेटसाठी आयसीसीने पाकिस्तानला मोठा दणका दिला आणि दंडासह त्यांचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतील ४ गुणही वजा केले.
