Shaheen Afridi Creates World Record in T20 WC: इंग्लंडने पाकिस्तानला २ विकेट्सने पराभूत करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. यासह आता पाकिस्तान संघावर स्पर्धेबाहेर होण्याचं सावट आहे. पण पाकिस्तानने इंग्लंडला या सामन्यात चांगलीच टक्कर दिली होती. याच श्रेय गोलंदाज शाहीन आफ्रिदीला जातं. शाहीन आफ्रिदीने पाकिस्तानला दणक्यात सुरूवात करून दिली होती. इंग्लंडविरूद्ध सामन्यात शाहीन आफ्रिदी आपल्या नेहमीच्या फॉर्मात दिसला. या कामगिरीसह शाहीनने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
इंग्लंडचा संघ पाकिस्तानने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला, पण शाहीन आफ्रिदीने इंग्लंडच्या फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही. यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक मात्र पाकिस्तानला भारी पडला आणि त्याने संघाला सहज विजय मिळवून दिला. पण शाहीन आफ्रिदीने इतर फलंदाजांना पळता भुई थोडी केली.
सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे लक्ष्य ठेवून उतरलेल्या इंग्लंडला शाहीनने पॉवरप्लेमध्येच दणके दिले. त्याने पहिल्याच चेंडूने सुरुवात केली. इंग्लंडविरुद्ध पहिलं षटक टाकण्यासाठी आला आणि पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टची विकेट घेतली. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पहिल्या चेंडूवर सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता आणि आता त्यात भर घातली आहे. टी-२० विश्वचषकात पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट्स घेणारा तो गोलंदाजही आहे.
त्यानंतर शाहीन आफ्रिदी दुसरं षटक टाकण्यासाठी आला आणि जोस बटलरची महत्त्वाची विकेट घेतली. शाहीनने पॉवरप्लेमध्ये तिसरं षटक टाकलं आणि जेकब बेथेलला बाद केलं. यासह त्याने पॉवरप्लेमधील ३ षटकांत १३ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. पॉवरप्लेमध्ये इंग्लंडने फक्त ३५ धावांत तिन्ही विकेटस गमावल्या आणि त्यांची सुरुवात खराब झाली. पण ब्रुकने संघाचा डाव सावरला आणि त्याने शतकी खेळी केली. शतक केल्यानंतर शाहीनने त्याच्या स्पेलमधील चौथ्या षटकातही ब्रुकला क्लीन बोल्ड करत विकेट मिळवली.
इंग्लंडविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये तीन विकेट्स घेत शाहीन शाह आफ्रिदीने कागिसो रबाडाचा विश्वविक्रम मोडला. तो आता पुरुषांच्या टी-२० विश्वचषकात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी शाहीन शाह आफ्रिदीने पॉवरप्लेमध्ये १५ विकेट्स घेतल्या होत्या. कागिसो रबाडाच्या नावावर १६ विकेट्ससह विश्वविक्रम होता. पण, इंग्लंडविरुद्ध तीन विकेट्स घेतल्यानंतर, शाहीनच्या टी-२० विश्वचषकातील पॉवरप्लेमध्ये आता १८ विकेट्स झाल्या आहेत.
टी-२० विश्वचषकातील पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स
१८ विकेट्स – शाहीन आफ्रिदी, पाकिस्तान
१६ विकेट्स – कगिसो रबाडा, दक्षिण आफ्रिका
१५ विकेट्स – अँजेलो मॅथ्यूज, श्रीलंका

