पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी २०२२ मध्ये शेवटच्या वेळी पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. पीएसएलच्या सातव्या हंगामात तो क्वेटा ग्लॅडिएटर्सचे प्रतिनिधित्व करणार आहे. ४१ वर्षीय आफ्रिदी गेल्या वर्षी मुलतान सुलतान्सकडून पीएसएलमध्ये खेळला होता. त्यांच्या संघाला विजेतेपद मिळवण्यात यश आले. आफ्रिदीशिवाय इंग्लंडचा क्रिकेटपटू जेम्स विन्सही मुलतान सुलतान्स सोडून ग्लॅडिएटर्सकडून खेळताना दिसणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात शाहिद आफ्रिदी म्हणाला, ”क्वेटा ग्लॅडिएटर्समध्ये सामील होण्यासाठी मी उत्साहित आहे. २०१९ मध्ये पीएसएलचे जेतेपद पटकावले असले तरी, या संघासाठी मागील काही हंगाम चढ-उतारांनी भरलेले आहेत. माझ्या शेवटच्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये, २०१७ मध्ये पेशावर झल्मीसोबत जेतेपद पटकावल्यानंतर क्वेटासह यावेळी चॅम्पियन बनून माझा लीग प्रवास संपवण्याचे माझे स्वप्न आहे.”

पीएसएलच्या सहाव्या हंगामाच्या उत्तरार्धात आफ्रिदी मुलतान सुलतान्सकडून खेळू शकला नाही. सरावादरम्यान त्याला पाठीच्या खालच्या भागात दुखापत झाली. या कारणास्तव, तो यूएईमध्ये आयोजित दुसऱ्या टप्प्यात सहभागी झाला नाही. मात्र, त्यांचा संघ विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.

हेही वाचा – विषयच संपला..! गांगुलीनं सांगितलं विराटच्या हकालपट्टीचं ‘खरं’ कारण; रोहितबाबत म्हणाला, ‘‘आमचा…”

आफ्रिदीच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने ३२६ सामन्यात ४३९५ धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि १० अर्धशतके केली आहेत. त्याने २५२ षटकारही मारले आहेत. गोलंदाज म्हणून त्याने टी-२० मध्ये ३४४ विकेट घेतल्या आहेत. ७ धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने ११ वेळा ४ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.