येत्या १७ ऑगस्टपासून आशिया चषक स्पर्धा सुरू होते आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून भारताला विजेतेपद मिळवून देईल, अशी आशा सर्व भारतीय चाहत्यांना आहे. गेल्या ३ वर्षांपासून विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक करता आलेले नाही. त्याच्या फॉर्मबद्दल अनेकांकडून प्रतिक्रिया येत असताना आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पाच शब्दांमध्ये कोहलीच्या भविष्याबाबत आपले मत मांडले आहे.

हेही वाचा – FTX Crypto Cup: १७ वर्षीय प्रज्ञानंदने विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला केलं पराभूत; ठरला स्पर्धेचा उपविजेता

आफ्रिदीने सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यादरम्यान एका व्यक्तीने त्याला ‘कोहलीच्या भविष्याबद्दल तुला काय वाटते?’, असा प्रश्न विचारला. त्यावेळी आफ्रिदीने पाच शब्दात प्रतिक्रिया दिली. या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, ‘ते त्याच्या स्वत:च्या हातात आहे’. आफ्रिदीची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

आशिया चषकात भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहेत. २८ ऑगस्टरोजी हा सामना खेळवला जाणार आहे. गेल्यावर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान हा पहिलाच सामना असेल. विश्वचषकातील टी-२० सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला असला, तरी आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. गेल्या वर्षभरात भारतील क्रिकेट संघात अनेक बदल झाले आहेत. तसेच नव्या खेळाडूंचाही समावेश झाला आहे. त्यामुळे हा सामना आणि कोहलीच्या फॉर्मकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.