Omkar Tarmale Hattrick: आयपीएल २०२६ स्पर्धा संपल्यानंतर आता मुंबई टी-२० लीग स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत मुंबईतील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळत आहे. ज्या खेळाडूला आयपीएल स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादने ३० लाखांची बोली लावून संघात स्थान दिलं, पण संपूर्ण हंगाम बाकावर बसवून ठेवलं. त्याच खेळाडूने आता हॅट्ट्रिक घेऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आकाश टायगर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ठाणे ईगल स्ट्रायकर्स संघाचा वेगवान गोलंदाज ओमकार तरमळेने भेदक गोलंदाजी करून या स्पर्धेत हॅट्ट्रिक घेण्याचा कारनामा केला आहे.

शहापूर तालुक्यातील भूमिपुत्र ओमकार तरमळेने मुंबई टी-२० लीग स्पर्धेत हॅट्ट्रिक घेत इतिहास घडवला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत केवळ एकाच गोलंदाजाला हॅट्ट्रिक घेता आली होती. आता शहापूर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा ओमकार तरमळे हा या स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा दुसराच गोलंदाज ठरला आहे. तर खास रेकॉर्ड असा की, ओमकार हा मुंबई टी- २० लीग स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणारा पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. ताशी १४० हून अधिकच्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या ओमकारने पहिल्या सामन्यातही दमदार गोलंदाजी केली होती.

या सामन्यात ठाणे ईगल स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार शार्दुल ठाकूरने घेतलेला हा निर्णय ओमकार तरमळेने सार्थ ठरवला. ओमकार डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने चौकार खेचला. पण त्यानंतर ओमकारने दमदार पुनरागमन केलं. त्याने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर लागोपाठ ३ विकेट्स घेऊन आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली.

ओमकार तरमळेला आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने ३० लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. पण प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा असल्याने त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. पण त्याने मेहनत करणं सोडलं नाही. अनुभवी गोलंदाजांचं मार्गदर्शन त्याला टी-२० मुंबई लीग स्पर्धेत कामी येत आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात त्याने ३ गडी बाद केले होते. आता आकाश टायगर्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही त्याने ४ षटकात अवघ्या २० धावा खर्च केल्या आणि ३ गडी बाद केले. त्याची या हंगामातील कामगिरी पाहता आगामी आयपीएल हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळू शकते.