कोलकाता नाईट रायडर्सला पावसाच्या हजेरीमुळे एक गुण गिफ्ट म्हणून मिळाला आहे. आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सची कामगिरी आतापर्यंत निराशाजनक राहिली आहे. संघाने पहिले दोन्ही सामने गमावले आणि तिसऱ्या सामन्याची सुरुवातही खराब झाली. त्यानंतर, पावसामुळे ३.४ षटकांनंतर सामना थांबवण्यात आला आणि संघाचे मालक शाहरुख खान व केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर यांच्यातील गंभीर संभाषणाचे फोटो व्हायरल झाले.
कोलकाता नाईट रायडर्सचा ईडन गार्डन्स मैदानावरील पंजाब किंग्सविरूद्धचा सामना पाहण्यासाठी संघाचा सहमालक शाहरूख खानने हजेरी लावली होती. शाहरूख खानसह त्याची लेक सुहाना खानदेखील संघाला चिअर करण्यासाठी ईडन गार्डन्स मैदानावर उपस्थित होती. यादरम्यान पावसामुळे सामना थांबलेला असताना शाहरूख खान संघाच्या सीईंओसोबत गंभीर चर्चा करताना दिसला.
पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. दरम्यान, नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय टीकेचा विषय ठरला आहे. दुसऱ्या षटकातच कोलकाताला दोन मोठे धक्के बसले. झेवियर बार्टलेटने एकाच षटकात फिन ॲलेन आणि कॅमेरून ग्रीन यांना बाद केलं. यानंतर, सीईओ आणि मालक शाहरुख खान यांच्यातील संभाषणाचे फोटो समोर आले आहेत, ज्यावरून असं सूचित होतं आहे की केकेआरचे मालक संघाच्या कामगिरीवर खूश नसावेत.
पावसामुळे सामना थांबवलेला असताना शाहरूख खान सातत्याने चर्चा करताना दिसला. त्याच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली. इतकंच नाही तर, जेव्हा त्याने कोलकाता नाईट रायडर्सचे सीईओ वेंकी म्हैसूर यांच्याशी संवाद साधला, तेव्हा लोकांनी फोटो पोस्ट करून तर्कवितर्क सुरू केले. चाहते असे म्हणत आहेत की शाहरुख खान केकेआरच्या कामगिरीवर खूश दिसत नाहीये. शाहरूख खान बोलत असताना संघाचे सीईओदेखील पूर्ण वेळ शांत होते.
कोलकाता नाईट रायडर्सच्या कामगिरीबद्दल बोलायचं झाल्यास, पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांना ६ गडी राखून पराभूत केलं. अनेक गोलंदाजांच्या दुखापतीमुळे केकेआरची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. त्यानंतर, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात कोलकाताची फलंदाजी कमकुवत ठरली आणि संघ ६५ धावांनी पराभूत झाला. संघ या हंगामातील आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे. दोन पराभवांनंतर, संघ गुणतालिकेत ९व्या स्थानावर आहे. पंजाब किंग्सविरूद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला.
