India v West Indies 2nd T20I: वेस्ट इंडिजने २५० धावांचा यशस्वी पाठलाग करत इतिहास घडवला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पावरपाऊस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजला या फॉरमॅटमधील सर्वोत्तम संघांपैकी एक का म्हटलं जातं, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांचीत पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर २४९ धावा केल्या होत्या. २५० धावांचा पाठलाग करताना शे होप आणि रुदरफोर्डच्या वादळी फटकेबाजीच्या बळावर वेस्ट इंडिजने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केल्या. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.

वेस्ट इंडिजला हा सामना जिंकण्यासाठी २५० धावा करायच्या होत्या. आव्हान खूप मोठं होतं, त्यामुळे वेस्ट इंडिजला चांगल्या सुरूवातीची गरज होती. पण मयंक यादवने सुरूवातीलाच वेस्ट इंडिजला २ मोठे धक्के दिले. पहिल्याच षटकात कामिल पूरन आणि शिमरॉन हेटमायर स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर शे होप आणि पॉवेलने मिळून वेस्ट इंडिजचा डाव सावरला. दोघांनी मिळून संघाची धावसंख्या ५० धावांच्या पार पोहोचवली. त्यानंतर मयंक यादवने आणखी एक धक्का देत पॉवेलला बाद करत माघारी धाडलं.

होप- रूदरफोर्डची भागीदारी…

वेस्ट इंडिजला ज्या भागीदारीची गरज होती, ती भागीदारी शे होप आणि शेरफेन रुदरफोर्डने केली. मधल्या षटकांमध्ये या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दोघांनी मिळून चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दोघांनी मिळून १२० धावांची भागीदारी केली. यादरम्यान रुदरफोर्डने अवघ्या ३७ चेंडूंमध्ये ७ चौकार आणि ७ षटकांराच्या साहाय्याने ८४ धावांची खेळी केली. शेवटी शे होप नाबाद राहिला आणि शतक पूर्ण करून वेस्ट इंडिजला विजय मिळवून दिला.

ही चूक टीम इंडियाला महागात पडली

भारतीय संघाने सुरूवातीपासूनच सामन्यावर मजबूत पकड बनवली होती. पण मधल्या षटकांमध्ये वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. होप आणि रूदरफोर्डने सामना फिरवला. पण रूदरफोर्ड १० व्या षटकातच बाद होऊन माघारी परतला असता. कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर रुदरफोर्डला बाद करण्याची संधी निर्माण झाली होती. पण शॉर्ट फाईन लेगला मयंक यादवने सोपा झेल सोडला. त्यावेळी रुदरफोर्ड अवघ्या ३९ धावांवर फलंदाजी करत होता.

भारतीय संघाने दिलं २४९ धावांचं आव्हान

या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. कारण अभिषेक शर्मा अवघ्या २० धावा करून माघारी परतला. त्यानंतर संजू सॅमसनने ८२ धावांची दमदार खेळी केली. इशान किशनने आपल्या घरच्या मैदानावर खेळताना ४३ धावांची वादळी खेळी केली. शेवटी फलंदाजी करताना तिलक वर्माने ४४ आणि इशान किशनने ४३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ५ गडी बाद २४९ धावा केल्या.