कोणत्याही खेळाडूचं मूल्यमापन करताना त्या कालखंडातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंशी तुलना केली जाते. गेल्या महिनाभरात वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होप भारतीय गोलंदाजांना पुरुन उरला आहे. तडाखेबंद खेळी करत शे होपने वेस्ट इंडिजला सातत्याने जिंकून दिलं आहे. गेल्या दशकभरात वनडे क्रिकेटमध्ये अव्वल ३ फलंदाज पाहिले तर यामध्ये विराट कोहली, रोहित शर्माच्या बरोबरीने शे होपचं नाव आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट वर्षागणिक रसातळाला जात असताना शे होपने दर्जेदार क्रिकेटची पताका फडकावत ठेवली आहे. कर्णधार, यष्टीरक्षक आणि सलामीवीर अशी तिन्ही भूमिका निभावणाऱ्या मोजक्या खेळाडूंमध्ये शे होपचा समावेश होतो. भारत दौऱ्यात शे होपची बॅट तळपते आहे. गेल्या दशकभरात वनडेतील सर्वोत्तम फलंदाज पाहिले तर टॉप ३ मध्ये विराट, शे आणि रोहित अशी नावं आहेत.
शे या कालावधीत १५८ सामन्यात ५१च्या सरासरीने ६५९० धावा केल्या आहेत. यामध्ये २१ शतकं आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. वनडेत खेळपट्टीचा नूर ओळखून फलंदाजी करावी लागते. शेवटच्या हाणामारीच्या षटकांमध्ये धावगती वाढवावी लागते. धावांचा पाठलाग करताना कोणाला लक्ष्य करायचं, मैदानाच्या कुठल्या बाजूला बाऊंड्री छोट्या आकाराची आहे, कोणत्या गोलंदाजांना आदर द्यायचा हे ठरवून खेळावं लागतं. ९०च्या दशकात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, जॅक कॅलिस, सईद अन्वर हे ज्या पद्धतीने डावाची आखणी करत असत तसंच शे खेळतो. ५० षटकं यष्टीरक्षण केल्यानंतरही तो फलंदाजीसाठी सज्ज असतो आणि व्हाईस व्हर्सा.
विराट कोहली आणि रोहित शर्मा ज्या पद्धतीने भारतीय संघाचे तारणहार झाले तसं शे होपही झाला. मात्र बाकी साथीदारांची साथ नसल्याने वेस्ट इंडिजचा संघ जिंकताना दिसत नाही.
२१व्या वर्षी होपने कसोटी पदार्पण केलं. दोन वर्षांनंतर होपने हेडिंग्ले इथे इंग्लंडविरुद्ध खेळताना दोन्ही डावात शतक झळकावत संघाला थरारक विजय मिळवून दिला. कसोटी संघातलं स्थान डळमळीत झालं तरी होपने वनडे संघाचा आधारस्तंभ झाला. खणखणीत प्रदर्शनाच्या बळावर होपला नेतृत्वाची धुराही सोपवण्यात आली. वनडेच्या बरोबरीने होपने टी२० प्रकारातही स्वत:ची छाप उमटवली.
आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने शे होपला ताफ्यात सामील करून घेतलं. मात्र होपच्या ताकदीचा अंदाज दिल्ली संघव्यवस्थापनाला आला नाही. त्याला अंतिम अकरात नियमित संधी मिळाल्या नाहीत.
