Shai Hope reveals MS Dhoni advice after historic ODI win vs India: कर्णधार शे होपच्या उत्कृष्ट खेळीच्या बळावर वेस्ट इंडिजने भारतावर तिसऱ्या वनडे सामन्यात ५ विकेट्सने विजय मिळवला. सलामीला आलेला शे होप संघाला विजय मिळवून देतच माघारी परतला. होपला संघातील इतर खेळाडूंची चांगली साथ लाभल्याने संघाला विजय मिळवून देण्यात तो यशस्वी ठरला. वेस्ट इंडिजच्या विजयानंतर आणि सामनावीर ठरल्यानंतर एम एस धोनीने दिलेल्या सल्ल्याचा त्याला कसा उपयोग झाला आणि धोनीने काय सल्ला दिला होता, याचा खुलासा केला.
शे होपने भारताविरूद्ध वनडे मालिकेत सलग दुसरी शतकी खेळी साकारली. शे होपने तिसऱ्या वनडे सामन्यात १४३ चेंडूत १७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने नाबाद १६२ धावा केल्या. इतकंच नव्हे तर निम्मा सामना तर शे होपला क्रॅम्प येत असतानाही त्याच्याशी झगडत त्याने संघाला विजय मिळवून दिला. या नाबाद खेळीनंतर शे होप सामन्याचा सामनावीर ठरला.
भारताविरूद्ध सामना जिंकून मालिका चांगल्या पद्धतीने संपवल्यानंतर होप म्हणाला, “हो, भारतात धावांचा पाठलाग करताना खेळणं तुलनेने सोपं असतं, विशेषतः दव पडायला सुरुवात झाल्यानंतर. आम्हालाही मालिका दमदार विजयासह संपवायची होती. त्यामुळे आजच्या सामन्यात संघाने लक्ष्य गाठलं, याचा मला आनंद आहे. बहुधा ३० षटकांनंतर मला मांडीच्या सांध्याजवळ (ग्रोइन एरिया) थोडा त्रास जाणवायला लागला. पण त्यानंतर शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहण्याचा प्रयत्न केला.
डावाची गती कशी ठरवली आणि धावांचा पाठलाग कसा सांभाळला? याबद्दल सांगताना होपने धोनीचं नाव घेतलं. होप म्हणाला, “सर्वात आधी तर संघात एक फलंदाज कमी होता आणि विटेल लॉजचा विचार केला, तर कदाचित दोन फलंदाज कमी होते. त्यामुळे हे आव्हानात्मक होणारच होतं. याआधी माझं महान खेळाडू एमएस धोनीसोबत खूप छान बोलणं झालं होतं. त्याने मला सांगितलं होतं की, तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुमच्याकडे नेहमीच जास्त वेळ असतो.
“त्यामुळे मी निकालाचा फार विचार न करता प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. सामन्याचं छोट्या-छोट्या भागांमध्ये विभाजन करून परिस्थिती समजून घेण्याचा आणि डावाच्या शेवटच्या टप्प्यात चौकार-षटकार मारण्याच्या संधी शोधण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघ षटकांच्या बाबतीत मागे होता, याचाही मी विचार केला. त्यामुळे डावाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना काही क्षेत्ररक्षक आत घ्यावे लागणार, हे मला माहीत होतं. धावसंख्येचा बचाव करताना पाच क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या आत ठेवावे लागले, तर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी ते नेहमीच कठीण असतं.“
फलंदाजी करताना मी या सर्व गोष्टींचा विचार केला. आणि शेवटी आमच्यासाठी सर्व काही अपेक्षेप्रमाणे घडलं,” असं शे होपने अखेरीस सांगितलं.
