ढाका येथे सुरू असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश (PAKvsBAN) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस पावसामुळे वाहून गेला, त्यानंतर मैदानावरील प्रेक्षक खूपच निराश दिसत होते, परंतु बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने मनोरंजनाचे काम केले. पाऊस थांबेल आणि सामना सुरू होईल, अशी अपेक्षा प्रेक्षक सकाळपासूनच करत होते, मात्र तीन वाजता या दिवशी आणखी खेळ खेळता येणार नसल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले.

मात्र शाकिबने मैदानावर उपस्थित प्रेक्षकांची निराशा होऊ दिली नाही. भरलेल्या पाण्यात शाकिबने लहान मुलासारखी वॉटर स्लाईड करत प्रेक्षकांना आनंद दिला. खेळपट्टीवर टाकलेल्या कव्हर्सवर शाकिबने उडी मारत वॉटर स्लाईडचा आनंद घेतला. त्याचा या कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा – PHOTOS : आज एक-दोन नव्हे, तर टीम इंडियाच्या ५ क्रिकेटपटूंचा आहे ‘बर्थडे’; पाहा कोण आहेत ते

सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फक्त ६.२षटकेच खेळता आली आणि २७ धावा झाल्या. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने आतापर्यंत ६३.२ षटकांच्या खेळात २ गडी गमावून १८८ धावा केल्या आहेत. अझर अली आणि कर्णधार बाबर आझम नाबाद आहेत, बाबर आझमने ११३ चेंडूत ७१ धावा केल्या. पाकिस्तान बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे जिथे पाकिस्तानने टी-२० मालिकेत ३-०असा पराभव केला. पहिल्या कसोटीतही पाकिस्तानने बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव केला आहे.