दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावल्याने गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “हे लज्जास्पद असून वॉर्नरने…”

गौतम गंभीरने ट्विटरवरुन नाराजी व्यक्त करतानाच भारताचा फिरकीपटू आर. अश्वीनलाही यामध्ये टॅग केल्याचं पहायला मिळतंय

Gautam Gambhir
गंभीरने ट्विटरवरुन व्यक्त केली नाराजी

टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने अजिंक्य राहिलेल्या पाकिस्तानचा पराभव केला. मॅथ्यू वेड (१७ चेंडूंत नाबाद ४१) आणि मार्कस स्टॉइनिस (३१ चेंडूंत नाबाद ४०) यांच्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्थान निश्चित केलं. या सामन्यामध्ये दोन्ही संघांच्या फलंदाजांनी केलेल्या भन्नाट फलंदाजीबरोबरच सर्वाधिक चर्चेत राहिला तो ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने नो बॉलवर लगावलेला षटकार. हा षटकार सध्या चर्चेचा विषय ठरत असला तरी भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने यावरुन वॉर्नरवर टीका केलीय.

नक्की वाचा >> सकाळी ICU मधून डिस्चार्ज मिळाला अन् संध्याकाळी तो देशासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने गोलंदाजीच्या वेळी आठवं षटक फिरकीपटू मोहम्मद हाफिजला सोपवलं. या षटकातला पहिलाच चेंडू हाफिजने असा काही टाका की तो दोन टप्पा पडत वॉर्नरपर्यंत पोहचला.

वॉर्नरनेही या चेंडूवर अगदी लेग स्टम्पच्या बाहेर, क्रिझच्या बाहेर जात उंच षटकार लगावला. हा चेंडू दोन टप्पा आल्याने पंचांनी तो नो बॉल ठरवला आणि वॉर्नरला एका चेंडूमध्ये सात धावा मिळाल्या.

नक्की वाचा >> Video: पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने केली विराट, रोहित आणि राहुलची नक्कल; व्हायरल झाला व्हिडीओ

हा चेंडू नो होता का?, याबाबत मोहम्मद हाफिजने पंचांना विचारणा केली. तेव्हा पंचांनी दोन टप्पा टाकल्याने नो दिल्याचं सांगितलं.

अनेकांनी वॉर्नरच्या या षटकाराचं कौतुक केलं असलं तरी गौतम गंभीरला हा प्रकार आवडलेला नाही. वॉर्नरने लगावलेला षटकार हा खेळ भावनेच्या विरोधात असल्याचं गंभीरने ट्विटरवरुन म्हटलं आहे. इतकच नाही तर गंभीरने भारतीय फिरकीपटू रविचंद्रन अश्वीनला या ट्विटमध्ये टॅग करत यासंदर्भात त्याचं मत काय आहे असंही विचारलंय. “हे लज्जास्पद असून वॉर्नरने खेळ भावनेचा अनादर केलाय. तुला काय वाटतं अश्वीन?,” असं ट्विट गंभीरने केलं आहे. या ट्विटसोबत त्याने वॉर्नरने षटकार लगावतानाचे दोन फोटोही पोस्ट केलेत.

नक्की वाचा >> वादास कारण की… सानिया मिर्झा! ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्यादरम्यान भारतीयांमध्येच जुंपली

नक्की वाचा >> रिझवानने भेट म्हणून हेडनला दिली कुराणची प्रत; हेडन म्हणतो, “मी ख्रिश्चन असलो तरी…”

उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने १९ षटकांत गाठले. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचला शाहीन आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. डेव्हिड वॉर्नर (४९) आणि मिचेल मार्श (२८) यांनी अर्धशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला सावरले. मात्र, लेगस्पिनर शादाब खानने या दोघांसह स्टिव्ह स्मिथ (५) आणि ग्लेन मॅक्सवेल (७) या चौकडीला बाद करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले. पण स्टॉइनिस आणि वेड यांनी ८१ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shameful absolutely pathetic gautam gambhir slams david warner for hitting hafeez bizarre delivery for a six scsg

Next Story
ऑलिम्पिक पदकात पुण्याचाही वाटा -सायना
ताज्या बातम्या