Shane Warne son big claim on his death: ऑस्ट्रेलियाचा महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याचं २०२२ मध्ये थायलंडमध्ये निधन झालं. क्रिकेट विश्वाला धक्का देणाऱ्या या दुःखद घटनेला चार वर्षे उलटली आहेत. यानंतर आता त्याच्या मुलाने त्यांच्या मृत्यूच्या कारणाबद्दल एक मोठं वक्तव्य केलं असून त्यामुळे मोठा गौप्यस्फोट झाला आहे.
वयाच्या ५२व्या शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला. त्याचा मुलगा जॅक्सनने दावा केला आहे की, त्याच्या वडिलांचा मृत्यू कोविड-१९ लसीमुळे झाला. ‘2 Worlds Collide’ या पॉडकास्टवर बोलताना, जॅक्सनने आपल्या वडिलांच्या आरोग्याच्या समस्यांचीही कबुली दिली.
जॅक्सन म्हणाला, “मला नक्कीच वाटतं की यात कोविड लसीची भूमिका होती. मला नाही वाटत की आता हे बोलल्याने कोणताही वाद निर्माण होईल. वडिलांना आधीपासूनच काही आरोग्याशी निगडित समस्या होत्या, तरीही मला वाटतं की लसीमुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली. मी नेहमी याबद्दल विचार करतो. (वॉर्न यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर) फोन ठेवताच, माझी पहिली प्रतिक्रिया तात्काळ सरकार आणि कोविड लसीला दोष देण्याची होती.”
जॅक्सन म्हणाला की,शोकसभेत आपले विचार स्पष्टपणे मांडण्यापासून त्याने स्वतःला मोठ्या मुश्किलीने रोखलं. “शोकसभेत या गोष्टींचा खुलासा न करणं आणि शांत राहणं अधिक शहाणपणाचं ठरलं. जर मी काही बोललो असतो तर माझी परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती. याआधीही हृदयविकाराच्या झटक्याने बऱ्याच जणांचा मृत्यू झाला होता. पण बाबा ठीक होते. मला वाटतं त्यांनी ३-४ लसी घेतल्या होत्या.”
त्यांना (शेन वॉर्न) लस घ्यायची नव्हती, पण इतरांप्रमाणे दैनंदिन काम करण्यासाठी लस घेणं भाग पडलं. मला त्याबद्दल जास्त विचार करायचा नाही, कारण त्यामुळे फक्त राग वाढतो, असं जॅक्सन पुढे म्हणाला.
शेन वॉर्नच्या जीवनशैलीबद्दल बोलताना जॅक्सन म्हणाला की, धूम्रपान आणि मद्यपान करूनही ते निरोगी होते. “बाबा तेव्हा निरोगी आणि आनंदी होते. बऱ्याच काळानंतर ते खूप चांगले दिसत होते. ते नक्कीच धूम्रपान आणि मद्यपान करायचे, पण ऐंशी-नव्वद वर्षांचे अनेक लोक बाबांपेक्षा खूप जास्त धूम्रपान आणि मद्यपान करतात,” असे ते म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे वॉर्नच्या मृत्यूच्या काही महिन्यांपूर्वी त्याला कोविड-१९ ची लागण झाली होती. जेव्हा त्याचं अचानक निधन झालं, तेव्हा तो कोणत्याही गंभीर आजाराने त्रस्त नव्हता.
