Shane Warne Family to get 406 Crore after RR Sold for 15300 crore: आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी दोन ऐतिहासिक डील पाहायला मिळाल्या. राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ मोठ्या किंमतीना सोल्ड झाले. अमेरिकन बिझनेसमॅन काल सोमाणी यांनी राजस्थान रॉयल्स संघाची १५ हजार ३०० कोटींना खरेदी केली, जी आयपीएल इतिहासातील दुसरी सर्वात मोठी डील आहे. पण या मोठ्या डीलचा फायदा मात्र माजी दिवंगत खेळाडू शेन वॉर्नच्या कुटुंबाला झाला आहे. वॉर्न कुटुंबाला ४६० कोटी मिळणार आहेत, नेमकं कसं ते जाणून घेऊया.

शेन वॉर्न आता हयात नाहीत, पण त्यांच्या कुटुंबाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. राजस्थान रॉयल्स संघ १५,३०० कोटी रुपयांना विकला गेल्याने शेन वॉर्नच्या कुटुंबाला कोट्यवधी रूपये मिळणार आहेत. पण शेन वॉर्नच्या कुटुंबाला याचा फायदा कसा झाला हे सविस्तर जाणून घेऊया.

शेन वॉर्न एक उत्कृष्ट खेळाडू होता. पण भविष्याचा विचार करत त्यांची जी दूरदृष्टी होती, त्याचा प्रत्यय या एका निर्णयातून आपल्याला येतो. शेन वॉर्न हा आयपीएलमध्ये सोल्ड होणारा पहिला खेळाडू होतो आणि राजस्थान रॉयल्सचा पहिला कर्णधारदेखील. शेन वॉर्नच्या नेतृत्त्वाखालीच राजस्थानने स्पर्धेच्या पहिल्या सीझनमध्ये चॅम्पियन होण्याचा मान पटकावला होता.

राजस्थान रॉयल्स सोल्ड झाल्यानंतर शेन वॉर्नच्या कुटुंबाला का मिळणार ४०६ कोटी?

शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलचे चार हंगाम खेळला. यादरम्यान त्याला प्रति हंगाम ९.३५ कोटी रुपये पगार मिळत होता. मात्र, या पगाराव्यतिरिक्त त्याने राजस्थान रॉयल्सकडे आणखी एका गोष्टीची मागणी केली होती ती म्हणजे फ्रँचायझीमधील हिस्सेदारी. शेन वॉर्नची राजस्थान फ्रँचायझीमध्ये वार्षिक ०.७५ टक्के हिस्सेदारी होती. वॉर्न राजस्थानकडून आयपीएलचे चार हंगाम खेळला, त्यामुळे ०.७५ टक्क्यांप्रमाणे, राजस्थान रॉयल्समधील त्याची एकूण हिस्सेदारी ३ टक्के होती.

आता राजस्थान रॉयल्स संघ सुमारे १५,३०० कोटी रुपयांना विकला गेल्याने, त्यातील ३ टक्क्यांनुसार शेन वॉर्नचा वाटा सुमारे ४६० कोटी रुपये आहे, जो त्याच्या कुटुंबाला दिला जाईल. शेन वॉर्नने आयपीएलच्या चार हंगामांमध्ये राजस्थान रॉयल्सकडून ५५ सामने खेळून ५७ बळी घेतले. तो आयपीएल २००८ ते आयपीएल २०११ पर्यंत राजस्थान संघासोबत होता. त्याचा सर्वात यशस्वी हंगाम आयपीएल २००८ होता, ज्यात त्याने १९ बळी घेऊन संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मदत केली.

ऑस्ट्रेलियाच्या २००६-०७ च्या ॲशेस विजयानंतर वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. दोन वर्षांनंतर, २००८ च्या पहिल्या आयपीएल हंगामात तो मैदानावर परतला आणि राजस्थान संघात केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे, तर कर्णधार आणि मार्गदर्शक म्हणूनही सामील झाला. फ्रँचायझीने त्याच्यावर संपूर्ण जबाबदारी सोपवली, जी त्या काळात एक दुर्मिळ गोष्ट होती.

“माझ्या कराराचा एक भाग म्हणून… त्यांनी मला कर्णधार, प्रशिक्षक बनण्यास आणि माझ्या इच्छेनुसार क्रिकेट संघ चालवण्यास सांगितलं. मी सर्व काही सांभाळणारा होतो,” असे वॉर्नने ‘द हेराल्ड सन’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.