Biggest superstar on planet: शेन वॉर्नचा विराट कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव!

ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू शेन वॉर्न यानं विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचं कौतुक करत त्याला क्रिकेट जगतातला सर्वात मोठा सुपरस्टार म्हटलं आहे.

shane warne virat kohli
शेन वॉर्नची विराट कोहलीवर स्तुतीसुमनं!

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये भारतानं २-१ अशी आघाडी घेतली आहे. ओव्हलवर साहेबांच्या संघाला १५७ धावांनी धूळ चारत भारतानं आपलं कसोटी क्रिकेटमधलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या बहारदार कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत असताना ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यानं विराट कोहलीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला आहे. “विराट कोहली हा क्रिकेट जगतातला सर्वात मोठा सुपरस्टार आहे”, असं शेन वॉर्न म्हणाला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर एका क्रीडा वाहिनीवर झालेल्या चर्चेमध्ये शेन वॉर्ननं विराट कोहलीचं कोतुक केलं आहे.

एक कर्णधार म्हणून आवश्यक असतं की…

शेन वॉर्ननं यावेळी बोलताना विराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचा विशेष करून उल्लेख केला. “कोहली हा क्रिकेट जगतातला सर्वात मोठा सुपरस्टार आहे. भारतीय क्रिकेटपटू त्याला खूप मानतात. सर्वच खेळाडूंना त्याचा आदर वाटतो. हे खेळाडू त्याला पाठिंबा देतात आणि त्याच्यासाठी खेळतात. एक कर्णधार म्हणून हे आवश्यक असतं की तुमचा संघ तुमच्यासाठी खेळावा. मला वाटतं, ज्या पद्धतीने विराट वागतो, इतर खेळाडूंना वागवतो, आपण सगळ्यांनीच हे म्हटलंच पाहिजे..थँक यू विराट”, असं शेन वॉर्न म्हणाला.

भारत हे जागतिक क्रिकेटचं पावरहाऊस!

विराट कोहलीनं आत्तापर्यंत वेळोवेळी कसोटी क्रिकेटबद्दल बोलताना त्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. जगभरातल्या संघांनी कसोटी क्रिकेटला प्राधान्य द्यायला हवं, अशी भूमिका विराटने मांडली आहे. त्यावरून देखील शेन वॉर्नने विराटचं कौतुक केलं आहे. “विराटला कसोटी क्रिकेट आवडतं आणि त्याला विराटने प्राधान्य देखील दिलं आहे. भारत हे जागतिक क्रिकेटचं पावरहाऊस आहे. आणि भारताचे या पृथ्वीतलावरचा सर्वात मोठा सुपरस्टार आहे. विराट कोहली”, असं वॉर्न म्हणाला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारतानं दुसऱ्या डावात इंग्लंडला विजयासाठी तब्बल ३६८ धावांचं आव्हान दिलं होतं. त्यावर साहेबांचा संघ २१० धावांवर आटोपला आणि भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये २-१ अशी आघाडी घेतली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shane warne praised incian cricket team captain virat kohli biggest superstar on planet pmw

ताज्या बातम्या