नवी दिल्ली : भारतीय महिला संघाची माजी कर्णधार आणि क्रिकेट सल्लागार समिती सदस्य शांता रंगास्वामी यांनाही हितसंबंधाच्या आरोपासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) निती अधिकारी डी. के. जैन यांच्यापुढे साक्ष देण्यासाठी २८ डिसेंबर रोजी मुंबईत उपस्थित राहावे लागणार आहे. यापूर्वी, कपिल देव आणि अंशुमन गायकवाड यांनाही हा आदेश देण्यात आला आहे.
कपिल, गायकवाड आणि शांता यांचा समावेश असलेली सल्लागार समिती सप्टेंबरमध्ये बरखास्त करण्यात आली. त्यामुळे तूर्तास सल्लागार समिती कार्यरत नाही.
‘‘शांता यांनी सल्लागार समितीचा राजीनामा दिला असला तरी निती अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून या प्रकरणाविषयी अधिक स्पष्टीकरण हवे आहे. त्यामुळेच कपिल आणि गायकवाड यांच्यासह शांता यांनाही मुंबईतील या बैठकीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान याविषयी शांता यांचा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही.