Afghanistan Cricketer Shapoor Zadran Death: अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शपूर झादरानचं निधन झालं आहे. वयाच्या ३८व्या वर्षी दीर्घ आजाराने शपूरचं भारतात निधन झालं. झादरान बऱ्याच काळापासून इम्यून सिस्टीमसंबंधित एका गंभीर आजाराशी झुंज देत होते. दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील एका रुग्णालयात त्याच्या या आजारावर उपचार सुरू होते. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोस्ट करत शापूर झादरानच्या निधनाची बातमी दिली.
झादरान ‘हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस’ (HLH) या आजाराशी झुंज देत होता; हा रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित एक गंभीर विकार असून त्यामुळे शरीरातील अनेक अवयवांचे नुकसान होऊ शकते. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील मालिकेदरम्यान मोहम्मद नबी व रशीद खान यांनी रूग्णालयात जाऊन शपूर झादरानची भेटही घेतली होती.
झादरान गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आजारी पडला होता, त्यानंतर अफगाणिस्तानातील डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी भारतात जाण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला उपचारांचा चांगला परिणाम दिसून आला आणि त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं, परंतु २० दिवसांनंतर त्याची प्रकृती पुन्हा खालावली होती. त्यानंतर त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शापूर झादरानच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि देशाच्या क्रिकेटमधील त्याच्या योगदानाची दखल घेतली. शपूर झाद्रारानची खेळाप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण वाखाणण्याजोगं होतं आणि त्यामुळे अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत झाली, असं बोर्डाने नमूद केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर अफगाणिस्तानला ओळख मिळवून देणाऱ्या सुरुवातीच्या क्रिकेटपटूंपैकी तो एक होता.
शपूर झादरानची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द एका दशकाहून अधिक काळ होती; त्याने ११ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं. त्याने २००९ मध्ये अफगाणिस्तानसाठी पदार्पण केलं आणि २०२० मध्ये आपला शेवटचा सामना खेळला. यादरम्यान शपूर झादरानने ४४ एकदिवसीय (ODI) आणि ३६ टी-२० (T20I) सामने खेळले, ज्यामध्ये त्याने एकदिवसीय सामन्यांत ४३ आणि टी-२० सामन्यांत ३७ बळी (विकेट्स) घेतले. २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध विजयी धाव केल्यामुळे शपूर झादरानचं नाव लक्षात ठेवलं जातं.
क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीपलीकडे जाऊन, शापूर झादरानन अनेक अफगाण क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्थान होता. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने निवेदनात याबाबत उल्लेख करत सांगितलं आहे की त्यांनी अफगाणिस्तानच्या तरुणांना मोठी स्वप्ने पाहण्याचा मार्ग दाखवला आणि अफगाण क्रिकेटमध्ये आपण आपलं भविष्य घडवू शकतो, हा विश्वास त्यांच्यात निर्माण केला.
