Shapoor Zadran Funeral Video: अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर झादरान याला अखेरचा निरोप देताना अफगाणिस्तान संघातील खेळाडूंना अश्रू अनावर झाले. रशीद खान आणि रहमानुल्ला गुरबाजसह इतर सर्व खेळाडूही भावूक झाले आणि अंत्ययात्रेदरम्यान रडतानाचा खेळाडूंचे फोटो, व्हीडिओ समोर आले आहेत.. दीर्घ आजारानंतर वयाच्या ३८ व्या वर्षी शापूर झादरानचं निधन झालं. ‘एचएलएच’ (HLH) या दुर्मिळ आजाराशी झुंज देत असताना तो काही महिन्यांपासून भारतातील दिल्ली येथे रुग्णालयात दाखल होता. आपल्या वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधी शापूरचं निधन झालं.
शापूर झादराननच्या निधनामुळे जगभरात आणि विशेषतः अफगाणिस्तान क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओही वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अव्वल दर्जाचा फिरकीपटू रशीद खान आणि यष्टिरक्षक-फलंदाज रहमानुल्ला गुरबाज यांच्यासह अनेक खेळाडू शापूरला अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर झाल्याचं दिसत आहे.
शापूर झादरानच्या अंत्ययात्रेचे फोटो व व्हीडिओ अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अफगाणिस्तान संघाचे सर्व खेळाडू यादरम्यान उपस्थित होते आणि एकमेकांना सावरत आधार देत दे दु:ख पचवत होते. रशीद खानचा खेळाडूच्या खांद्यावर डोकं टेकून रडतानाचा फोटो सर्वच चाहत्यांना भावुक करणारा आहे.
इन्स्टाग्रामवर अत्यंत भावूक पोस्ट शेअर करताना अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू रशीद खानने लिहिलं, “जड अंतःकरणाने मी माझ्या अत्यंत प्रिय मित्राला निरोप देत आहे. सर्वांसोबत हसत-खेळत सुंदर आठवणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद. तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. माझ्या हृदयात तुझं स्थान नेहमीच खास असेल. माझ्या प्रिय मित्रा, तुझ्या आत्म्यास शांती लाभो.”
अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबी यानेही ‘एक्स’ (X) वर शापूरला श्रद्धांजली वाहिली आणि त्याचा देशाला अभिमान असल्याचं म्हटलं. नबीने लिहिलं, “शापूर भाई! देव तुझ्या कुटुंबाला व आप्तेष्टांना हे अतीव दुःख सहन करण्याचं बळ देवो. तू केवळ एक जवळचा मित्रच नव्हता, तर आपल्या मायभूमीचा खरा सेवक आणि अफगाणिस्तानच्या सन्मानाचे प्रतीक होतास. जरी आज तू प्रत्यक्षपणे आमच्यात नसलास, तरी तुधं नाव आणि तुझ्या आठवणी अफगाण जनतेच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.”
अफगाणिस्तानच्या क्रिकेटच्या इतिहासात शापूर झादरानचे नाव सदैव लक्षात राहील. २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्धच्या एका रोमांचक सामन्यात, त्याने शेवटच्या षटकात विजयी धावा केल्या आणि विश्वचषकाच्या इतिहासात अफगाणिस्तानचा पहिलावहिला विजय निश्चित केला. मैदानावरील त्याचा तो जल्लोष दोन्ही हात रुंद पसरवून केलेला आनंदोत्सव हा अफगाण क्रिकेटमधील सर्वात अविस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो.
