पुणे : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या घडमोडींवर लक्ष ठेवून असून, या प्रकरणावर आपण योग्य वेळी बोलू असे राज्य कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्राचा कुस्तीगिरांना कायमच पािठबा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रदीर्घ कालावधीनंतर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र कुस्ती परिषदेची बैठक शनिवारी वारजे येथील सह्याद्री क्रीडा संकुलातील सभागृहात पार पडली. त्या वेळी कुस्ती परिषदेचे ८० सदस्य उपस्थित होते. बैठकीत परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला, तसेच पुढील नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली.

ब्रिजभूषण यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय समितीने राज्य कुस्ती परिषदेवर अस्थायी समितीची नियुक्ती केली असली, तरी न्यायालयाने कुस्ती परिषदेलाच मान्यता दिली आहे. त्यामुळे दिल्लीत सुरू असलेल्या घडमोडींवर लक्ष ठेवून आपले काम सुरू ठेवायचे, असे मार्गदर्शनही पवार यांनी या वेळी सदस्यांना केले. राज्याच्या कार्यक्रमातील महिला महाराष्ट्र केसरी आणि कुमार अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या असून, आता वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद म्हणजेच ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या तयारीला सुरुवात करण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात आले.

क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे अधिकार काढून घेतले असून, निवडणूक घेण्यासाठी अस्थायी समितीची नियुक्ती केली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नियुक्त केलेल्या समितीने निवडणुका जाहीर केल्या की त्याप्रमाणे आपली कार्यवाही करायची, असेही बैठकीत ठरविण्यात आले. महासंघाच्या निवडणुकीसाठी परिषदेकडून दोन व्यक्ती पाठविल्या जाणार असून, त्यांची निवड करण्याचे अधिकार बैठकीत शरद पवार यांना देण्यात आले.