Shardul Thakur Record In IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धेच्या लिलावापूर्वी खेळाडूंच्या ट्रेडची जोरदार चर्चा रंगली आहे. सर्व संघांना १५ नोव्हेंबरपर्यंत आपल्या रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. त्याआधी ट्रेड डीलबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्ज संघात जाणार आणि रवींद्र जडेजा राजस्थान रॉयल्समध्ये येणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान ही चर्चा सुरू असताना ५ वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूरला आपल्या ताफ्यात स्थान दिलं आहे.
शार्दुल ठाकूर गेल्या हंगामात लखनौ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना दिसून आला होता.आगामी हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने शार्दुलला २ कोटी रोख रक्कम मोजून आपल्या संघात स्थान दिलं आहे.मुंबई आणि लखनौने कुठल्याही खेळाडूंची अदलाबदल न करता रोख रक्कम देऊन शार्दुलला आपल्या संघात स्थान दिलं. यादरम्यान शार्दुल ठाकूरच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
आयपीएल २०१७ स्पर्धेआधी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने शार्दुल ठाकूरची पहिल्यांदा ट्रेड डील केली होती. त्यावेळी तो पंजाब किंग्ज संघाकडून खेळायचा. त्यानंतर २०२३ मध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या शार्दुलला कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या ताफ्यात स्थान दिलं. दोन वेळा ट्रेड डील झाल्यानंतर आता शार्दुल ठाकूर तिसऱ्यांदा आयपीएल लिलावाआधी होणाऱ्या ट्रेड डीलनुसार लखनौ सुपर जायंट्सकडून मुंबई इंडियन्स संघात गेला आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात ३ वेळा ट्रेड होणारा शार्दुल हा पहिलाच खेळाडू ठरला आहे.
मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. यासह शार्दुल ठाकूरच्या नावे आणखी एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. शार्दुल ठाकूर हा हरभजन सिंग, पियुष चावला, अजिंक्य रहाणे, टीम साऊदी यांच्यानंतर ३ यशस्वी संघांकडून खेळणारा सहावा खेळाडू बनला आहे. शार्दुलला वानखेडे स्टेडियमवर खेळण्याचा चांगलाच अनुभव आहे. आता तो या अनुभवाचा किती फायदा करून घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
