रविवारी वानखेडे स्टेडियमवर अष्टपैलू शार्दूल ठाकूरने मुंबईसाठी दमदार पदार्पण केलं. ३ विकेट्ससह शार्दूलने मुंबईच्या विजयात सिंहाचा वाचा उचलला. तब्बल १३ वर्षानंतर मुंबईला हंगामातील पहिला सामना जिंकता आला. शार्दूलचा आयपीएल प्रवास चढउतारांनी भरलेला आहे. बॉलिंग ऑलराऊंडर शार्दूलला काही वर्षांपूर्वी एका संघाकडून अजब वागणुकीला सामोरं जावं लागलं होतं.
शार्दूलसाठी आयपीएलमधला हा सातवा संघ आहे. विजयानंतर बोलताना शार्दूलने आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘मी मुंबईतल्या मैदानांवर क्रिकेट शिकलो, वाढलो. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळण्याचा अनुभव अनोखा होता. मुंबई इंडियन्स संघाचा नेट बॉलर म्हणून मी काही हंगाम होतो. त्यावेळी मुंबईकडून खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते आज पूर्ण झालं’, असं शार्दूल म्हणाला.
‘शार्दूल हा चॅम्पियन गोलंदाज आहे. प्रतिस्पर्धी फलंदाजांना सापळ्यात अडकवण्यात तो वाकबगार आहे. तो आयपीएलमध्ये अनेक संघांकडून खेळला आहे. आता ही संघांची संगीतखुर्ची थांबव. निवृत्ती घेईस्तोवर मुंबईकडूनच खेळत राहा’, असं हार्दिकने शार्दूलला म्हटलं आहे.
२०१६ मध्ये काय घडलं होतं?
२०१६ मध्ये शार्दूल पंजाब किंग्ज संघाचा भाग होता. त्याला अंतिम अकरात संधी देण्यात येत नव्हती. त्यावर्षी रणजी स्पर्धेत शार्दूलने ४१ विकेट्स पटकावल्या होत्या. पंजाब किंग्ज संघाने त्याला रिटेन केलं मात्र अंतिम अकरात त्याला खेळायची संधी मिळाली नाही. गुजरात लायन्सविरुद्धच्या लढतीनंतर शार्दूलसह अरमान जाफर आणि प्रदीप साहू यांना संघातून रिलीज करण्यात आलं. स्पष्ट भाषेत त्यांना घरी पाठवण्यात आलं. या प्रकाराने शार्दूल संतापला.
अशा पद्धतीने माघारी पाठवल्याने खूप वाईट वाटलं. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मी आतूर होतो. मी बाकी खेळाडूंएवढीच कसून मेहनत करत होतो. संघ समीकरणांमुळे अंतिम अकरात संधी न मिळणं समजू शकतो. पण दोन महिने मला शिकायला मिळालं असतं. पंजाबच्या कोचिंग टीममध्ये दर्जेदार खेळाडूंचा समावेश होता. नेट्समध्ये अव्वल फलंदाजांना गोलंदाजी करणे हा अनुभव खूप काही शिकवणारा असतो. त्यांनी मला संघाबरोबर राहू द्यायला हवं होतं असं शार्दूल त्यावेळी म्हणाला होता. पंजाबने रिलीज केल्यानंतर शार्दूल मुंबईतल्या पय्याडे स्पोर्ट्स क्लबसाठी खेळला. पय्याडेकडून खेळताना शार्दूलने ३ विकेट्स घेतल्या. शार्दूलच्या चांगल्या कामगिरीच्या बळावर पय्याडेने सालारजंग कम्युनिटी स्पर्धेत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
या सामन्यात खेळण्याआधी शार्दूलने उपरोधिक ट्वीटही केलं होतं. ते ट्वीट व्हायरल झालं होतं. उद्या पय्याडे क्लबसाठी खेळणार आहे. दोन महिन्यांनंतर खेळायची संधी मिळणार आहे. आयपीएलने अनेक चमत्कार घडवले आहेत. खरंच घडवले आहेत असं शार्दूलने लिहिलं होतं.
२०१४ मध्ये झालेल्या लिलावात पंजाब किंग्जने २० लाख रुपये मोजून शार्दूलला संघात घेतलं होतं.
असंख्य संघांची वारी
या प्रकरणानंतर पंजाबने शार्दूलला रिलीज केलं. स्पॉटफिक्सिंगप्रकरणी कारवाई झाल्याने चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्सवर बंदी घालण्यात आली. चेन्नईचे बहुतांश खेळाडू आणि कोचिंग चमू रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होते. शार्दूल या संघाकडून खेळला. पुढच्याच वर्षी धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने शार्दूलला संधी दिली. २०१९ हंगामात चेन्नईने फायनलमध्ये धडक मारली. त्या लढतीत शार्दूलने २ विकेट्स घेतल्या. पण शेवटच्या चेंडूवर दोन धावा असताना मुंबईच्या लसिथ मलिंगाने त्याला बाद केलं. शार्दूलने त्या हंगामात चेन्नईसाठी सर्वाधिक विकेट्स पटकावणारा गोलंदाज होता. २०२२ मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सचा भाग झाला. मात्र त्यांनी वर्षभरात त्याला रिलीज केलं. २०२३ मध्ये शार्दूल कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला. २०२४ मध्ये तो पुन्हा चेन्नईकडे परतला. २०२५ मध्ये लखनौ सुपरजायंट्सने मोहसीन खान दुखापतग्रस्त झाल्याने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. यंदाच्या हंगामाआधी लखनौनं ट्रेडऑफमध्ये त्याला मुंबईकडे दिलं.
चेन्नईचा अपवाद वगळता कुठल्याच संघात शार्दूलला स्थैर्य लाभलं नाही. मुंबईकडून खेळताना पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी करत शार्दूलने इरादे स्पष्ट केले आहेत. शार्दूलचा जिवलग दोस्त रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आहे. वानखेडे स्टेडियमची शार्दूलला खडानखडा माहिती आहे. भागीदारी फोडण्यात पटाईत अशी त्याची ओळख आहे. गरज पडल्यास षटकार चोपण्याची कलाही त्याला अवगत आहे. दीपक चहरला दुखापतींनी घेरलेलं असतं. अशा परिस्थितीत शार्दूल मुंबई इंडियन्सच्या अंतिम अकरात कायमस्वरुपी असू शकतो.
वर्कलोडच्या बाबतीत आम्हाला गृहित धरलं जातं
वर्कलोड मॅनेजमेंट यावर सातत्याने चर्चा होते. पण याबाबतीत आम्हाला अनेकदा गृहित धरलं जातं आणि याचं व्यवस्थापन नीट केलं जात नाही असं मत अष्टपैलू शार्दूल ठाकूरने व्यक्त केलं. वर्कलोड सांभाळत सर्वोत्तम कामगिरी करणं हे आव्हानात्मक आहे याकडे त्याने लक्ष वेधलं. दुलीप ट्रॉफीत पश्चिम विभागाचं नेतृत्व करणाऱ्या शार्दूलने परखडपणे आपली मतं मांडली होती.
