IPL 2026 Mumbai Indians Trade Deal: आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी ट्रेड विंडो चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेड डीलबाबत अनेक बातम्या समोर आल्या आहेत. या सर्वांमध्ये, १९ व्या हंगामासाठी पहिली ट्रेड डील जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरी ट्रेड डीलही काहीच वेळात मुंबई इंडियन्स संघाने जाहीर केली. मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स व गुजरात टायटन्स या दोन संघांबरोबर ट्रेड करत महत्त्वाच्या खेळाडूंना ताफ्यात घेतलं आहे.
आयपीएल २०२६ साठीची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्स व लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झाली. ज्यात मुंबईने मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला संघात सामील केलं. तो गेल्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाकडून खेळणारा शार्दुल आता आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्स संघाचा भाग असणार आहे. मुंबई इंडियन्सने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.
मराठमोळा शार्दुल ठाकूर मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात
मुंबई इंडियन्सने शार्दुल ठाकूरला रोख रकमेत विकत घेतलं. याचा अर्थ दोन्ही संघांमध्ये खेळाडूंची देवाणघेवाण झाली नाही, उलट मुंबई इंडियन्सने त्याला लखनौ सुपर जायंट्सकडून २ कोटींच्या रोख रकमेत ताफ्यात घेतलं. लखनौ सुपर जायंट्सने गेल्या वर्षी शार्दुल ठाकूरला २ कोटी रुपयांना बदली खेळाडू म्हणून निवडले होते.
आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा शार्दुल ठाकूरची ट्रेडद्वारे संघात सामील झाला आहे. यापूर्वी, २०१७ मध्ये, रायझिंग पुणे सुपरजायंटने त्याला किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) कडून विकत घेतले होते. त्यानंतर, २०२३ च्या हंगामापूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सने त्याला दिल्ली कॅपिटल्सकडून विकत घेतले. हे दोन्ही व्यवहार पूर्णपणे रोख रकमेचे होते. दरम्यान, मुंबई इंडियन्समध्ये येणं ठाकूरसाठी एकप्रकारे घरवापसी आहे. २०१०-१२ मद्ये तो मुंबई इंडियन्ससाठी सपोर्ट बॉलर होता.
दरम्यान, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू शेरफेन रुदरफोर्डलाही ट्रेडद्वारे विकत घेतले आहे. शेरफेन रूदरफोर्डला मुंबई इंडियन्सने २.६ कोटींना गुजरात टायटन्सकडून विकत घेतलं आहे. शार्दुल ठाकूरप्रमाणे ही देखील कॅश डील होती. रूदरफोर्डदेखील अष्टपैलू खेळाडू आहे. वेस्ट इंडिजचा पॉवर हिटर खेळाडू रूदरफोर्ड त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तर तो वेगवान गोलंदाज असून महत्त्वाच्या विकेट्सही संघाला मिळवून देऊ शकतो.
