Shardul Thakur on test: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू आणि मुंबई संघाचा कर्णधार शार्दुल ठाकूरने भारतीय संघात पुनरागमन करण्याबाबत आपली इच्छा व्यक्त करणारं महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या ‘अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी’दरम्यान संघ व्यवस्थापनाने आपला प्रभावीपणे वापर केला नाही, असं या ३४ वर्षीय खेळाडूचं म्हणणं आहे. शार्दुल ठाकूर नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.
शार्दुल ठाकूर सोनी स्पोर्ट्सवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्या कॉमेंट्रीकरता उपस्थित होता. यादरम्यान कॉमेंट्री करताना टीम इंडियासाठी पुन्हा खेळण्याच्या आपल्या आशा अजूनही जिवंत असल्याचे स्पष्ट केलं असून, संधी मिळाल्यास देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यास तो सज्ज आहे.
गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्यात शार्दुल ठाकूरला केवळ दोन कसोटी सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. या दरम्यान त्याची कामगिरी संमिश्र होती; लीड्समध्ये भारताला पराभव पत्करावा लागला, तर मँचेस्टर कसोटी अनिर्णित राहिली. दौऱ्याचं विश्लेषण करताना ठाकूरने गोलंदाजी आणि रणनीतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळताना, त्याला त्या दोन कसोटी सामन्यांत मिळून केवळ २७ षटकं गोलंदाजी करण्याची संधी मिळाली.
इंग्लंड दौऱ्याकडे मागे वळून पाहताना शार्दूल ठाकूरने सांगितलं की, २०२४-२५ च्या देशांतर्गत हंगामातील दमदार कामगिरीच्या जोरावर त्याला अधिक सामने खेळण्याची संधी मिळायला हवी होती. त्याच्या मते, जर त्याच्यावर अधिक विश्वास दाखवून मोठी भूमिका दिली असती, तर तो मालिकेचा निकाल बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकला असता.
“यावर भाष्य करणं खूप कठीण आहे. पण २०२४-२५ च्या हंगामात मी ज्या प्रकारची कामगिरी केली, त्यानुसार मला इंग्लंड दौऱ्यावर आणखी काही सामने खेळण्याची संधी मिळायला हवी होती. तसं झालं असतं, तर मी नक्कीच सामन्याच्या निकालात फरक घडवू शकलो असतो,” असं ठाकूरने बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
शार्दुल ठाकूर याबद्दल बोलताना म्हणाला, “मला असं वाटतं की इंग्लंडमध्ये माझ्या गोलंदाजीचा योग्य वापर केला गेला नाही. माझ्याकडून खूपच कमी गोलंदाजी करून घेतली गेली आणि चुकीच्या टप्प्यांवर माझा वापर केला गेला. लीड्समध्ये मी निष्काळजी फटका खेळलो, ती माझी चूक होती. पण मँचेस्टरमध्ये मी अतिशय चांगली फलंदाजी केली.”
मँचेस्टरमधील त्याची खेळी भारताला सामन्यात टिकवून ठेवण्यासाठी निर्णायक ठरल्याचा त्याचा दावा आहे. “त्यावेळी वातावरण ढगाळ होतं, चेंडू स्विंग होत होता आणि काही ठिकाणी अनियमित उसळीही होती. त्या कठीण स्पेलचा मी सामना केला आणि त्यामुळे भारताला पहिल्या डावात भक्कम धावसंख्या उभारता आली. त्यानंतर खेळपट्टी सपाट झाली आणि आम्ही सामना वाचवू शकलो. दुसरा नवा चेंडू आल्यानंतर मी ती खेळी केली नसती, तर सामन्याचा निकाल वेगळाही लागू शकला असता. त्यामुळे मी भारतासाठी खेळताना कोणतंही योगदान दिलेलं नाही, असं म्हणणं योग्य ठरणार नाही,” असं ठाकूरने स्पष्ट केलं.
