Shashank Singh Cook Assualt Controversy: आयपीएलमध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणारा पंजाब किंग्सचा खेळाडू शशांक सिंग सध्या एका वादामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या घरी काम करणाऱ्या एका घरगड्याने, तिथे आपल्याला जबर मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर, शशांक सिंग आणि त्याचे वडील जे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आता शशांक सिंगने आपली बाजू मांडली आहे.

घरकाम करणाऱ्या व्यक्तीवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेबाबत शशांक सिंगने आता आपली बाजू मांडली आहे. त्याने दावा केला आहे की, विपेंद्र सिंग नावाच्या एका व्यक्तीने अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्याच्या घरी भेट दिली होती आणि तो घराचे फोटो व व्हिडिओ काढत होता. विपेंद्र चोरी करण्याच्या उद्देशानेच आला असावा, असा संशय शशांकला आला होता. शशांक सिंग नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊया.

तक्रारीतील आरोपांवर प्रतिक्रिया देताना शशांकने हे दावे फेटाळून लावले आणि तक्रारीत दिलेल्या कालावधीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, “असं काहीच घडलं नाही. एखादी व्यक्ती २५ तारखेच्या संध्याकाळी येते आणि २८ तारखेच्या सकाळी निघून जाते, तर त्याला जबरदस्ती बंद करून ठेवलं असं कसं म्हणता येईल?”

“तो अवघ्या तीन दिवसांपूर्वीच आमच्याकडे आला होता. पण त्याचा उद्देश काम करण्याचा नव्हता, तर आमच्याकडे चोरी करण्याचाच असावा, असा आमचा संशय आहे. कारण त्याचा मोबाईल तपासला असता तो माझ्या कपाटाचे, मी घड्याळे, सनग्लासेस आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवलेल्या जागांचे व्हिडीओ चित्रीत करत असल्याचं दिसून आलं. घरातील सजावटीच्या वस्तूंचेही त्याने व्हिडीओ काढले होते. तसेच, त्यापैकी काही वस्तू गायब असल्याचंही आमच्या लक्षात आलं,” असा दावा शशांकने केला.

“तो आमच्याकडे आला तेव्हा म्हणाला होता, ‘मला स्वयंपाक करता येतो. मी सर्व प्रकारचे पदार्थ बनवू शकतो.’ पण नंतर त्याने स्वतःच कबूल केलं की त्याला व्यवस्थित स्वयंपाक करता येत नाही. मग अशा व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा?” असा सवाल शशांकने केला. पुढे आरोप करत शशांक म्हणाला, “तो घरात आल्यानंतर बेडरूमचे व्हिडीओ काढू लागला. महागड्या आणि आलिशान वस्तू ठेवलेल्या बेडरूममध्येही तो गेला, तेथील व्हिडीओ रेकॉर्ड केले आणि इतर लोकांना पाठवले.”

“तो माझ्या वडिलांच्या एका मित्राच्या ओळखीने आमच्याकडे आला होता. त्यांनीच त्याची शिफारस करत तो सर्व प्रकारचा स्वयंपाक करू शकतो, असं सांगितलं होतं. म्हणूनच आम्ही त्याला कामावर ठेवलं. मात्र, घरात येताच त्याने २० हजार रुपयांच्या आगाऊ मानधनाची मागणी केली” असं शशांकने सांगितलं.

तो अमली पदार्थांचं सेवन करायचा – शशांक सिंग

“आम्ही रेवा येथे त्याच्याबाबत चौकशी केली असता, तो यापूर्वी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचं समोर आलं. त्याला तिथे दोन-तीन वेळा पकडण्यातही आलं होतं. आमच्या घरीही तो सकाळी आला तेव्हा त्याचं डोकं गरगरत होतं आणि तो थरथरत असल्याचं आईने सांगितलं. त्यानंतर वडिलांनी रेवामध्ये पुन्हा पडताळणी केली असता, त्याला अमली पदार्थांच्या सेवनाचा इतिहास असल्याचं स्पष्ट झालं.”

“आमच्याकडून एक चूक झाली. यापूर्वी आमच्या घरी कामासाठी येणाऱ्या सर्व व्यक्ती पडताळणी झालेल्या एजन्सीमार्फत नियुक्त केल्या जात होत्या. मात्र, या व्यक्तीला वडिलांच्या जवळच्या ओळखीतील एका व्यक्तीच्या शिफारशीवरून कामावर ठेवण्यात आले होते,” असं शशांकने सांगितलं.

“हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत. तो त्याच्या शरीरावरील जखमांच्या खुणा दाखवत आहे, पण आमच्याकडे त्याचा एक व्हिडीओ आहे. त्यामध्ये आम्ही त्याला सांगितलं होतं की, तुझ्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला बोलाव, त्यानंतरच तुला जाऊ दिलं जाईल. त्या वेळी त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमेच्या खुणा नव्हत्या. तो घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचं कोणाशी भांडण झालं की आणखी काही घडलं, हे मला माहीत नाही. मात्र, त्यानंतरच त्याच्या शरीरावर या सर्व जखमांच्या खुणा दिसू लागल्या,” असा दावा शशांकने केला.

शशांकच्या म्हणण्यानुसार, त्याच्या कुटुंबाने संबंधित स्वयंपाक्याला काही दिवस काम करून दाखवण्यास सांगितलं होतं. त्यानंतरच मानधन आणि पुढे काम सुरू ठेवायचं की नाही, याबाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान, नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आपल्यावर मारहाण झाल्याचा आरोप स्वयंपाकी तोमरने केल्यानंतर शशांक, त्याचे वडील आणि कुटुंबाच्या वाहनचालकाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.