Shashi Tharoor on Mustafizur Rahman: बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेत तेथील अल्पसंख्याक हिंदूंना लक्ष्य करण्यात आले. या हिंसाचारात आतापर्यंत चार हिंदू पुरूषांची जमावाने मारहाण करून हत्या केली आहे. यानंतर भारतात तीव्र पडसाद उमटले. आयपीएमधील केकेआर संघात बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिझूर रहमान ९.२० कोटी रुपयांत घेतल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. अनेकांनी यावरून शाहरूख खानला लक्ष्य केले. त्यानंतर आता मुस्तफिझूर रहमानला आयपीएलमधून बाजूला केले आहे. यानंतर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुस्तफिझूर रहमानला गेल्या काही दिवसांपासून विरोध होत होता. यावरून केकेआर संघाचा मालक शाहरुख खानलाही इशारा दिला जात होता. विरोधाचा सूर पाहून अखेर बीसीसीआयने मुस्तफिझूर रहमान याला संघातून रिलीज करावे, असे आदेश कोलकाता नाईट रायडर्स संघाला दिले. गरज भासल्यास केकेआरला त्याच्या जागी दुसरा बदली खेळाडू निवडण्याची परवानगी दिली जाईल, असेही बीसीसीआयने सांगितले.

मुस्तफिजूर रहमानच्या हकालपट्टीमुळे हिंदुत्ववादी संघटना, भाजपाचे नेते समाधान व्यक्त करत असताना काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मात्र वेगळाच मुद्दा उपस्थित करत बीसीसीआयवर टीका केली. बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याकांवरील हल्ल्यांमध्ये क्रिकेटला ओढले जाऊ नये, असे ते म्हणाले.

काय म्हणाले शशी थरूर?

शशी थरूर यांनी एक्सवर एक व्हिडीओ आणि पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, शशी थरूर म्हणाले, देशातील राजकीय परिस्थितीमुळे एखाद्या क्रिकेटपटूला शिक्षा देणे निंदनीय आहे. जर हा खेळाडू वेगळ्या धर्माचा असता तर बीसीसीआय असेच वागले असते का? असा प्रश्नही थरूर यांनी उपस्थित केला.

“मुस्तफिझूरवर घातलेली बंदी निषेधार्ह आहे. त्याच्या जागी बांगलादेशमधील क्रिकेटपटू लिटन दास किंवा सौम्या सरकार असते तर काय झाले असते? आपण इथे कुणाला शिक्षा देत आहोत? एक राष्ट्र, एक व्यक्ती की धर्म? खेळाचे हे अविचारी राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाईल?”, असाही प्रश्न शशी थरूर यांनी उपस्थित केला.

१६ डिसेंबर रोजी झालेल्या आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात केकेआर संघाने मुस्तफिझूर रहमान याला विकत घेतले आहे. या लिलावात सात बांगलादेशी खेळाडूंनी भाग घेतला होता, मात्र फक्त मुस्तफिझूर रहमान याच्यावरच बोली लागली. त्याची बेस प्राइस दोन कोटी रुपये होती, मात्र केकेआर संघाने ९.२० कोटी रुपयांची अखेरची बोली लावत त्याला संघात सामील करून घेतले. परंतु देशभरात बांगलादेशविरोधी पवित्र्यामुळे शनिवारी त्याला संघातून रिलीज करण्याचे आदेश बीसीसीयने दिले आहेत.

बांगलादेशचे किती खेळाडू आयपीएल स्पर्धेत आहेत?

यंदाच्या लिलावात मुस्तफिझूर वगळता बांगलादेशच्या अन्य खेळाडूंना संघात घेण्यात फ्रँचाइजींनी स्वारस्य दाखवले नाही. त्यामुळे या हंगामात मुस्तफिझूर हा बांगलादेशचा एकमेव खेळाडू असणार होता. मात्र आता तोही खेळू शकणार नाही. दरम्यान याआधी बांगलादेशचे ६ खेळाडू आयपीएल स्पर्धेत खेळले आहेत. यामध्ये बांगलादेशचे माजी कर्णधार शकीब अल हसन, मश्रफी मुर्तझा आणि मोहम्मद अशरफुल यांचा समावेश आहे.