लंडन : पुढील महिन्यात ट्वेन्टी-२० विश्वचषकासह भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. पद सोडणार असल्याचे संकेत देतानाच, अपेक्षेहून अधिक सर्व काही साध्य केले, अशी समाधानकारक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

‘‘आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक माझ्यासाठी महत्त्वाचा असेल. परंतु माझ्या कार्यकाळात संघाने आधीच बरेच काही खास प्राप्त केले आहे. भारतीय संघ पाच वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये अग्रस्थानावर आहे. ऑस्ट्रेलियात दोनदा आणि इंग्लंडमध्ये एकदा आम्ही विजय मिळवला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही अनेक बलाढ्य संघांना त्यांच्या भूमीवर हरवले आहे,’’ असे सध्या विलगीकरणात असलेले ५९ वर्षीय शास्त्री म्हणाले.

प्रकाशनावर करोना प्रसाराचा दोषारोप चुकीचा!

लंडन : पुस्तक प्रकाशन कार्यक्रम आयोजित केल्याची कोणतीही खंत मला वाटत नाही. या कार्यक्रमाद्वारे माझ्यासह काही मार्गदर्शकांना करोनाची लागण झाल्यामुळे भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना रद्द करावा लागला, हा दोषारोप चुकीचा आहे, असे शास्त्री यांनी सांगितले. ‘‘ओव्हल कसोटीला आम्ही ज्या पायऱ्यांवरून वावरत होतो, त्याच मार्गाचा किमान पाच हजार नागरिक वापर करीत होते. मग पुस्तक प्रकाशनाकडे अंगुलिनिर्देश कशासाठी? या कार्यक्रमाला जवळपास २५० जण उपस्थित होते. त्यापैकी कुणालाही करोना झालेला नाही,’’ असे शास्त्री म्हणाले.