scorecardresearch

इराणी चषकावर पुन्हा शेष भारताची मोहोर!

गोलंदाजांनी दुसऱ्या डावात केलेल्या भरीव कामगिरीच्या बळावर शेष भारत संघाने मध्य प्रदेशचा २३८ धावांनी धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा इराणी चषकावर मोहोर उमटवली.

sp shesh bharat team win
इराणी चषकावर पुन्हा शेष भारताची मोहोर!

मध्य प्रदेशचा २३८ धावांनी धुव्वा; सौरभ कुमारचे तीन बळी

पीटीआय, ग्वाल्हेर : गोलंदाजांनी दुसऱ्या डावात केलेल्या भरीव कामगिरीच्या बळावर शेष भारत संघाने मध्य प्रदेशचा २३८ धावांनी धुव्वा उडवत सलग दुसऱ्यांदा इराणी चषकावर मोहोर उमटवली. ग्वाल्हेर येथे झालेल्या या सामन्यात सुरुवातीपासूनच शेष भारताच्या संघाने वर्चस्व गाजवले. शेष भारताने विजयासाठी गतहंगामातील रणजी विजेत्या मध्य प्रदेशसमोर ४३७ धावांचे आव्हान ठेवले होते.

याचा पाठलाग करताना पाचव्या दिवशी २ बाद ८१ धावांवरून पुढे खेळणाऱ्या मध्य प्रदेशचा दुसरा डाव १९८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे शेष भारताच्या संघाने इराणी चषक आपल्याकडे राखला. या डावात डावखुरा फिरकीपटू सौरभ कुमारने (३/६०) प्रभावी मारा केला. त्याला वेगवान गोलंदाज मुकेश कुमार (२/३४) आणि अतित शेठ (२/३७) यांच्यासह ऑफ-स्पिनर पुलकित नारंगची (२/२७) उत्तम साथ लाभली.

४३७ धावांचा यशस्वी पाठलाग करण्यासाठी मध्य प्रदेशला फलंदाजांकडून मोठय़ा खेळींची आवश्यकता होती. चौथ्या दिवसअखेर मध्य प्रदेशची २ बाद ८१ अशी धावसंख्या होती आणि कर्णधार हिमांशू मंत्री ५१ धावांवर नाबाद होता. मात्र, पाचव्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर नवदीप सैनीच्या गोलंदाजीवर हिमांशूला पंचांनी बाद ठरवले. यष्टीरक्षक उपेंद्र यादवने झेल पकडला. परंतु यष्टीरक्षकाने झेल पकडण्यापूर्वी चेंडू हिमांशूच्या बॅटला लागला नसल्याचे ‘री-प्ले’मध्ये स्पष्ट दिसत होते. मात्र, या सामन्यात ‘डीआरएस’ उपलब्ध नसल्याचे हिमांशूला माघारी परतावे लागले. यानंतर हर्ष गवळी (४८), अमन सोळंकी (३१) आणि अंकित कुशवाह (२३) यांचा अपवाद वगळता मध्य प्रदेशच्या फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

यशस्वी जैस्वाल सामनावीर

पहिल्या डावात २१३ धावा आणि दुसऱ्या डावात १४४ धावांची शानदार खेळी करत शेष भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डावखुऱ्या यशस्वी जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. ‘‘पहिल्या दिवसअखेर मी नाबाद राहिलो असतो, तर पहिल्या डावात कदाचित त्रिशतकही केले असते आणि त्याचा मला अधिक आनंद झाला असता. मला अभिमन्यू ईश्वरनसोबत फलंदाजी करताना मजा आली,’’ असे सामन्यानंतर यशस्वी म्हणाला. ईश्वरनने पहिल्या डावात १५४ धावा केल्या होत्या. यशस्वी आणि ईश्वरनने ३७१ धावांची भागीदारी रचली होती.

संक्षिप्त धावफलक

  • शेष भारत (पहिला डाव) : ४८४
  • मध्य प्रदेश (पहिला डाव) : २९४
  • शेष भारत (दुसरा डाव) : २४६
  • मध्य प्रदेश (दुसरा डाव) : ५८.४ षटकांत सर्वबाद १९८ (हिमांशू मंत्री ५१, हर्ष गवळी ४८, अमन सोळंकी ३१; सौरभ कुमार ३/६०, पुलकित नारंग २/२७, मुकेश कुमार २/३४, अतित शेठ २/३७)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-03-2023 at 00:02 IST