टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवनने त्याचं नाव पाकिस्तानच्या खेळाडूंबरोबर घेतल्याने वर्ल्ड टी२० कॉन्टिनंट स्पर्धेच्या संयोजकांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये शिखरने यासंदर्भात माहिती दिली आहे. चाहत्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये आणि चुकीच्या बातम्या पसरवू नये अशी विनंती त्याने केली आहे.
शिखर या स्पर्धेत एशिया वॉरियर्स संघाकडून खेळणार आहे असं पोस्टमध्ये म्हटलं होतं. या संघात पाकिस्तानचेही खेळाडू आहेत. या स्पर्धेशी कोणताही संबंध नाही आणि यात खेळत नसल्याचं धवनने म्हटलं आहे. ‘वर्ल्ड टी२० कॉन्टिनंट कप स्पर्धेत नाव असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. मला माहिती किंवा कल्पना देता संयोजकांनी मी या स्पर्धेत खेळणार असल्याचं म्हटलं आहे. माझे विधि सल्लागार यासंदर्भात संयोजकांवर कारवाई करतील. प्रसारमाध्यमांना आणि चाहत्यांना विनंती आहे की त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. चुकीच्या माहितीवर आधारित वृत्तांकन करू नये. तुमच्या सदोदित पाठिंब्यासाठी मनापासून ऋणी आहे’, असं धवनने म्हटलं आहे.
दरम्यान शिखर धवनसह एशिया वॉरियर्स संघात राहुल शर्मा, गुरकीरत सिंग मान, अभिमन्यू मिथुन यांचंही नाव होतं. एशिया वॉरियर्सच्या २४ सदस्यीय संघात सोहेल तन्वीर, इफ्तिकार अहमद, मुहम्मद इम्रान खान या पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचा समावेश आहे. धवनचं नाव पाकिस्तानच्या खेळाडूंबरोबर दाखवण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. या संघात उपुल थारंगा, दिमुथ करुणारत्ने, दिलहारा लोकुटिगे, निसला गमागे, लहिरु थिरिमाना, रुबेल हुसेन, महमदुल्ला रियाझ, इम्रूल केयस, सूरज कुमार, समीउल्ला शिनवारी, सोहेब मकसूद, अविष्का परेरा, उस्मान कादीर यांचा समावेश आहे. श्रीलंकेचे माजी कर्णधार मर्वन अट्टापट्टू या संघाचे प्रशिक्षक तर सुमीत राणा सहाय्यक प्रशिक्षक आहेत.
भारत पाकिस्तान संबंधासंदर्भात धवनने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यावेळी शिखर व्यक्त झाला होता. ‘भारताने दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. भारत माता की जय’, असं धवनने लिहिलं होतं. आणखी एका पोस्टमध्ये धवनने पाकिस्तानच्या दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती.
