भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना आज पु्ण्यात खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी अर्धशतकी सलामी देत चांगली सुरुवात करून दिली. मागील काही सामन्यांपासून संघाबाहेर असलेला धवन या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. रोहित बाद झाल्यानंतर धवनने कर्णधार विराट कोहलीला हातीशी घेत संघाची धावगती वाढवली. त्यानंतर शतकाकडे कूच करणाऱ्या धवनला बेन स्टोक्सने झेलबाद केले. धवनने 11 चौकार आणि 2 षटकारांसह 98 धावांची खेळी साकारली.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये धवन सहा वेळा ‘नर्व्हस नाईंटीज’चा शिकार झाला आहे. 143 धावा ही धवनची एकदिवसीय कारकिर्दीची सर्वोत्तम धावसंख्या आहे. 2019मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात धवनने ही खेळी साकारली होती. आज सुरू असलेला इंग्लंडविरुद्धचा सामना धवनच्या कारकिर्दीचा 140वा सामना आहे. त्याने आतापर्यंत एकूण 17 शतके ठोकली आहेत.

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरू असणाऱ्या या लढतीत रोहित शर्मा-शिखर धवन ही अनुभवी जोडी सलामीला उतरणार असल्याचे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केल्यामुळे प्रामुख्याने धवनच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. मात्र, धवनने चमकदार कामगिरी करत आपणही कमी नसल्याचे सिद्ध केले आहे.