भारतीय संघाचा डावखुरा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने जवळपास दोन वर्षांनी मुलगा झोरावरची भेट घेतली. या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर मुलाला पाहताच धवन त्याच्यापासून दूर राहू शकला नाही. त्याने धावत जाऊन मुलगा जोरावरला उचलले. हा भावनिक व्हिडिओ धवनने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
धवनचा मुलगा झोरावर ऑगस्ट २०२० पासून ऑस्ट्रेलियात आहे. कोविड निर्बंध आणि प्रोटोकॉलमुळे २०२० पासून धवन आपल्या मुलाला भेटू शकला नाही. झोरावर त्याची बहीण आलियासोबत वडिलांना भेटायला आला होता.
व्हिडिओ शेअर करताना भारताचा सलामीवीर धवनने लिहिले, ”मला माझ्या मुलाला भेटून दोन वर्षे झाली आहेत. त्याच्याशी खेळणे, मिठी मारणे, बोलणे, हा खूप भावनिक क्षण आहे. हा तो क्षण आहे, जो कायम स्मरणात राहील.”
हेही वाचा – ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूचा पाकिस्तानात राडा..! ‘या’ कारणासाठी हॉटेलमधील झुंबरावर फेकली बॅट आणि हेल्मेट
धवन सध्या संघाबाहेर असून तो पुढील महिन्यात आयपीएलमध्ये व्यस्त असणार आहे. धवन पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करेल. ब्रेकमध्ये तो आपल्या मुलासोबत वेळ घालवत आहे. गेल्या वर्षी शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी विभक्त झाले. आयशाने इंस्टाग्रामवर एक मोठी पोस्ट लिहून घटस्फोटाबाबत आपले मत मांडले. धवनने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.