भारतीय संघ २७ तारखेच्या रात्री दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना झाला. मात्र सलामीवीर शिखर धवनची पत्नी आणि मुलगा दुबईमध्ये अडकून पडले आहेत. विमान कंपनीने घातलेल्या गोंधळामुळे धवन अत्यंत संतापला असून त्याने आपली नाराजी ट्विटवरून व्यक्त केली आहे.

दोन ट्विटमध्ये धवनने एमिरिट्स एअरवेजचा खरपूस समाचार घेतला. एमिरिट्सने दिलेली वागणूक व्यवसायिक कंपनीला शोभणारी नाहीय. मी माझ्या कुटुंबाबरोबर दक्षिण आफ्रिकेला जात असताना हा प्रसंग घडला. दुबईवरून दक्षिण आफ्रिकेला जाणाऱ्या विमानामध्ये माझ्या पत्नीला आणि मुलाला चढू दिले नाही. मुलाच्या जन्माचा दाखला दाखवल्याशिवाय विमानात प्रवेश नाही असे आम्हास सांगण्यात आले. त्यावेळी विमानतळावर आमच्याकडे दाखला असणे शक्यच नसल्याने त्या दोघांना दुबईमध्येच थांबावे लागल्याची माहिती धवनने ट्विटरवरून दिली. पुढील ट्विटमध्ये धवन म्हणतो आता ते दुबई विमानतळावर कागदपत्रांची वाट पाहत थांबले आहेत. जेव्हा आम्ही मुंबईमधून विमानात बसलो तेव्हाच एमिरिट्सने या कागदपत्रांची गरज असल्याची कल्पना आम्हाला का दिली नाही असा सवाल त्याने केला आहे. त्याचप्रमाणे विमान कंपनीचा एक कर्मचारी गरज नसताना संतापजनक वागत होता असा आरोपही धवनने केला आहे. याप्रकरणी कंपनीने अजून कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

 

धवनच्या घोट्याला दुखापत झाल्याने तो पाच जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटीमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.