Shimron Hetmyer World Record: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात करो या मरो सामना खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या शिमरॉन हेटमायरने वादळी सुरूवात केली. हेटमायर यंदाच्या टी-२० विश्वचषकात वादळी फॉर्मात आहे. त्याने जणू काही षटकारांची आतिषबाजी केली आहे. यासह त्याने टी-२० वर्ल्डकपमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने फलंदाजीला सावध सुरूवात केली. भारताच्या गोलंदाजांनी चांगली सुरूवात करत विकेट्स घेतल्या नसल्या तरी धावाही दिल्या नाहीत. पण शिमरॉन हेटमायरने येताच फटकेबाजीला सुरूवात केली आणि त्याने षटकार खेचताच मोठा विक्रम आपल्या नावे केला.

शे होप झेलबाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायर फलंदाजीला आला. त्याने येताच पुढील षटकात षटकार खेचला आणि फॉर्म दाखवून दिला. शिमरॉन हेटमायरला बुमराहमुळे या सामन्यात फक्त १२ चेंडू खेळण्याची संधी मिळाली. बुमराहच्या लेंग्थ चेंडूवर खेळायला जाताना चेंडू त्याच्या बॅटची कड घेत संजू सॅमसनकरवी झेलबाद झाला. त्यापूर्वी हेटमायरने १२ चेंडून २ षटकार व एका चौकारासह २७ धावा केल्या.

शिमरॉन हेटमायरचा वर्ल्ड रेकॉर्ड

शिमरॉन हेटमायर हा एका टी-२० विश्वषकात सर्वाधिक षटकार लगावणारा फलंदाज ठरला आहे. त्याने एका विश्वचषकात १९ षटकार लगावले आहेत. आजवर एका टी-२० वर्ल्डकप एडिशनमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हेटमायरने वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. यानंतर साहिबजादा फरहानने देखील यंदा १८ षटकार लगावले आहेत. तर त्याच्यानंतर या यादीत निकोल पूरनचा समावेश आहे. ज्याने २०२४ च्या टी-२० विश्वचषकात १७ विकेट्स घेतल्या आहेत. तर ख्रिस गेल २०१२च्या टी-२० विश्वचषकातील १६ षटकारांसह चौथ्या स्थानी आहे. तर पाचव्या स्थानी अफगाणिस्तानचा फलंदाज रहमानुल्ला गुरबाज आहे.

एका टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज

१९ शिमरॉन हेटमायर (२०२६)
१८ साहिबजादा फरहान (२०२६)
१७ निकोलस पूरन (२०२४)
१६ ख्रिस गेल (२०१२)
१६ रहमानउल्लाह गुरबाज (२०२४)

भारताच्या गोलंदाजीविरूद्ध अखेरच्या षटकांमध्ये वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डर व रोव्हमन पॉवेल यांनी फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी ७६ धावांची भागीदारी रचत वेस्ट इंडिजला २० षटकांत १९५ धावांपर्यंत पोहोचवलं आहे. आता भारताला सेमीफायनल गाठण्यासाठी १९६ धावांचं मोठं आव्हान आहे.