Shimron Hetmyer Catch Video: वेस्ट इंडिजचा संघ हा आपल्या स्फोटक फलंदाजीसह क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जातो. या संघात इतके चपळ खेळाडू आहेत, जे कितीही कठीण झेल सहज घेऊ शकतात. आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पहिला सामना स्कॉटलंडविरूद्ध पार पडला. या सामन्यात शिमरोन हेटमायरने फलंदाजी करताना दमदार अर्धशतकी खेळी केली आणि वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारून देण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना त्याने सीमारेषेवर अविश्वसनीय कॅच घेतला. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १८२ धावा केल्या होत्या. विजयासाठी १८३ धावांचा पाठलाग करत असलेल्या स्कॉटलंडला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले. सलामीला आलेला मायकल जोन्स १ धाव करून माघारी परतला. तर ब्रेंडन मॅक्मुलेनने १४ धावांचे योगदान दिले. सलामीला आलेल्या जॉर्ज मुंसेने १५ चेंडूत १९ धावांची खेळी केली. पण त्याला बाद करण्यासाठी हेटमायरने भन्नाट झेल घेतला.
तर झाले असे की, स्कॉटलंडचा संघ धावांचा पाठलाग करत असताना वेस्ट इंडिजकडून सहावे षटक टाकण्यासाठी शमार जोसेफ गोलंदाजीला आला. त्यावेळी चौथ्या चेंडूवर जॉर्ज मुंसे स्ट्राईकवर होता. शमार जोसेफने डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाविरूद्ध गोलंदाजी करताना राऊंड द विकेटचा मारा केला. त्याने लेग स्टंपवर चेंडू टाकला. या चेंडूवर जॉर्ज मुंसेने लेग साईडच्या दिशेने मोठा फटका मारला. हा चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने जात होता. त्यावेळी हेटमायरने डाईव्ह मारून एका हाताने अविश्वसनीय कॅच घेतला. हा कॅच पाहून कोणालाच विश्वास बसत नव्हता. या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
वेस्ट इंडिजचा दमदार विजय
या सामन्यात स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने ५ गडी बाद १८२ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून पहिल्या डावात फलंदाजी करताना शिमरोन हेटमायरने दमदार अर्धशतकी खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या स्कॉटलंडचा डाव १४७ धावांवर आटोपला. यासह वेस्ट इंडिजने हा सामना ३५ धावांनी आपल्या नावावर केला.
