Shimron Hetmyer Wicket Controversy: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करून सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. आता भारतीय संघ भारतात परतला असून, भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना लखनौच्या एकाना स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजने चांगली सुरूवात केली. पण शिमरन हेटमायरच्या विकेटवरून वाद पेटला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
या सामन्यात भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजकडून शे होप आणि कमिल पूरनची जोडी डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात आली. दोघांनी चांगली सुरूवात करून दिली. पण अर्शदीप सिंगने कमिलला बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर शिमरन हेटमायर फलंदाजीला आला. शिमरनने पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून सुरूवात केली. पण पुढच्याच चेंडूवर तो धावबाद होऊन माघारी परतला.
नेमकं काय घडलं?
तर झाले असे की, पावरप्लेचे शेवटचे षटक टाकण्यासाठी अक्षर पटेल गोलंदाजीला आला. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शे होपने फटका मारला आणि धाव घेण्याचा प्रयत्न केला. अक्षर पटेलने फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या हातून निसटला आणि श्रेयस अय्यरच्या हातात गेला. श्रेयसने चेंडू उचलून वेगवान थ्रो मारला आणि संजूनेही वेगाने यष्ट्या उडवल्या. हेटमायरने डाईव्ह मारली, त्यावेळी त्याला वाटलं की तो सहज पोहोचला आहे. पण ज्यावेळी डीआरएसमध्ये पाहिलं गेलं, त्यावेळी त्याची बॅट तर आत पोहोचली होती. पण बॅटचा जमिनीशी कुठलाही संपर्क झालेला नव्हता. त्यामुळे अंपायरने त्याला बाद घोषित केलं. त्यामुळे हेटमायर वाद घालताना दिसून आला. पण शेवटी त्याला अंपायरने दिलेला निर्णय मान्य करावा लागला आणि मैदान सोडावं लागलं. या विकेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
