टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सेमी फायनल प्रवेशाच्या दृष्टीने दमदार विजय अपेक्षित असणाऱ्या भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्धही संघर्ष करावा लागला. मध्यमगती गोलंदाज शिवम दुबेच्या गोलंदाजीवर झिम्बाब्वेने २६ धावा फटकावल्या. गली क्रिकेटला शोभावं अशा स्वरुपाचं हे षटक होतं.

प्रमुख गोलंदाजांना विश्रांती देण्याच्या उद्देशाने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने शिवम दुबेला गोलंदाजी दिली. शिवम गेले काही महिने गोलंदाजीवर मेहनत घेत आहे. भागीदारी तोडण्यात निपुण अशी त्याची ओळख झाली आहे. मात्र झिम्बाब्वेविरुद्ध शिवमला गोलंदाजी देणं भारतीय संघाला चांगलंच महागात पडलं.

दुबेच्या षटकात पहिल्या चेंडूवर ब्रायन बेनेटने दोन धावा धावून काढल्या. पुढच्या चेंडूवर बेनेटने खणखणीच षटकार लगावला. तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार लगावत बेनेटने तो षटकार चमत्कार नसल्याचं सिद्ध केलं. या प्रहाराने शिवमची लयच हरपली.

शिवमने टाकलेला पुढचा चेंडू पंचांनी वाईड दिला. त्यापुढचा चेंडू निर्धाव पडला. मात्र यानंतर शिवमने टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्याही अनेक घरं उजवीकडे होता. या चेंडूचं काय करावं न कळलेल्या बेनेटने तोही चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने यासंदर्भात पंचांना विचारणा केली. त्यांनी नोबॉलचा इशारा दिला. एवढं पुरेसं नाही म्हणून शिवमचा पुढचा चेंडू वाईड पडला.

अजब प्रकार म्हणजे शिवमने आणखी एक वाईड टाकला. अखेर वैध ठरलेल्या शेवटच्या चेंडूवर बेनेटने सणसणीत षटकार चोपला. अशाप्रकारे १० चेंडूत झिम्बाब्वेने २६ धावा कुटल्या. झिम्बाब्वेसाठी भारताने दिलेलं लक्ष्य गाठणं आवाक्याबाहेरचं आहे पण शिवमच्या षटकामुळे त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

भारताला सेमी फायनल प्रवेशासाठी दोन्ही लढतीत विजय आवश्यक आहे.