विशाखापट्टणम : भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यात पराभव पत्करावा लागला. मात्र, या पराभवातही शिवम दुबेची वादळी खेळी ही भारतीय संघासाठी सकारात्मक गोष्ट ठरली. डावखुऱ्या दुबेने २३ चेंडूंत ६५ धावा फटकावताना ट्वेन्टी-२० संघातील आपले महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. दुबेने आपल्या प्रगतीचे श्रेय सुधारलेल्या ‘मानसिकतेला’ आणि खेळावर सातत्याने घेतलेल्या ‘मेहनती’ला दिले.

दुबेने लेग-स्पिनर ईश सोधीच्या एका षटकात २९ धावा फटकावण्याची कामगिरी केली. फिरकी गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके मारण्यासाठीच दुबे ओळखला जातो. मात्र, त्याने जेकब डफी आणि मॅट हेन्री या वेगवान गोलंदाजांविरुद्ध मारलेले तीन षटकार अधिक लक्षवेधी ठरले. आता वेगवान गोलंदाज आणून आपल्याला रोखता येणार नाही, हेच जणू त्याने या खेळीतून दाखवून दिले.

“मी गेल्या काही वर्षांत माझ्या खेळावर प्रचंड मेहनत घेतली आहे. सातत्याने सामने खेळत असल्यामुळे माझी मानसिकता बदलली आहे. गोलंदाज काय योजना आखू शकतो, हे आता मला अधिक चांगल्या प्रकारे समजते,’’ असे दुबेे सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत म्हणाला.

या मालिकेत दुबेला नियमित गोलंदाजीचीही संधी मिळाली आहे. “गौतम भाई (प्रशिक्षक गंभीर) आणि सूर्या भाई (कर्णधार सूर्यकुमार) गोलंदाजीतही माझ्यावर विश्वास दाखवत आहेत. याचा मला निश्चितच फायदा झाला आहे. गोलंदाजी केल्यामुळे फलंदाज म्हणूनही आपण अधिक हुशार होतो. गोलंदाजाची काय योजना, तो काय विचार करून गोलंदाजी करत आहे, हे आपल्याला समजते.

मी या आघाडीवर काम करत आहे,” असे दुबेने सांगितले. नियमित संधी आणि अनुभवामुळे आपण मागील काही महिन्यांत अधिक परिपक्व झाल्याचे त्याने मान्य केले. “प्रत्येक खेळाडू स्वतःला अपडेट करत असतो. मीही पूर्वीसारखाच राहू शकत नाही. माझी ताकद काय आहे आणि कुठे आक्रमण करायचे, हे मला कळले आहे,” असे दुबे म्हणाला. वेगवान गोलंदाजांविरुद्धचा आत्मविश्वास वाढल्यामुळे प्रतिस्पर्ध्यांवर अधिक दबाव टाकता येतो, असेही दुबेने स्पष्ट केले.