Shivam Dube Reaction After Taking Catch Of Virat Kohli: आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला. दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पार पडला. या मैदानावर धावांचा डोंगर उभारला जातो. या सामन्यातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकांअखेर २५० धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने पूर्ण जोर लावला. पण चेन्नईचा संघ विजयापासून ४३ धावा दूर राहिला. यादरम्यान विराट कोहलीच्या विकेटवरून चांगलाच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. बंगळुरूकडून विराट कोहली आणि फिल सॉल्टची जोडी मैदानावर आली. यादरम्यान तिसऱ्याच षटकात विराट कोहलीने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू शिवम दुबेकडे गेला. त्याला झेल टिपण्याची संधी होती. पण दुबेकडून हा झेल सुटला. त्यावेळी विराट अवघ्या ७ धावांवर फलंदाजी करत होता.

शिवम दुबेने सोडलेल्या झेलमुळे विराट कोहलीला ७ धावांवर जीवदान मिळालं. याचा फायदा घेऊन विराटने पुढच्याच षटकात तुफान फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज संघावरील दबाव वाढला.

पण नशीब चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होतं. त्यामुळे हा झेल सोडणं जास्त महागात पडलं नाही. चेन्नई सुपर किंग्ज संघाला विराट कोहलीला बाद करण्याची आणखी एक संधी मिळाली. त्यावेळी विराट कोहली २८ धावांवर फलंदाजी करत होता. चेंडू पुन्हा एकदा शिवम दुबेच्या हातात गेला. चेंडू हवेत असताना शिवम दुबे वेगाने धावला आणि हा झेल टिपला. झेल घेतल्यानंतर शिवम दुबेने चेंडू रागात जमिनीवर आपटला. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकांअखेर २५० धावा केल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून टीम डेव्हिडने नाबाद ७० धावांची खेळी केली. तर देवदत्त पडिक्कलने ५० धावांची खेळी केली आणि रजत पाटीदारने नाबाद ४८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नई सुपर किंग्जकडून सर्फराज खानने ५० धावा केल्या. तर प्रशांत वीरने ४३ आणि जेमी ओव्हरटनने ३७ धावा केल्या. पण चेन्नईचा डाव २०७ धावांवर आटोपला.