Shivam Dube on POTM Award: भारतीय संघाने नेदरलँड्सविरूद्ध अखेरच्या गट टप्प्यातील सामन्यात शानदार विजय नोंदवला. टीम इंडियाने अष्टपैलू शिवम दुबेच्या कामगिरीच्या बळावर नेदरलँड्स संघाचा १७ धावांनी पराभव केला. भारतीय संघ आधीच सुपर-८ मध्ये पोहोचल्याने नेदरलँड्सविरूद्ध सामना संघासाठी सराव सामना होता. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार शिवम दुबेला मिळाला. यासह त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवची इच्छाही पूर्ण केली. हा पुरस्कार मिळाल्यानंतर दुबे काय म्हणाला, पाहूया.
नेदरलँड्स संघाने प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला मधल्या षटकांत उत्कृष्ट गोलंदाजी करत धावा काढण्याची संधी दिली नाही. ६९ धावांवर ३ विकेट्स अशी अवस्था असताना शिवम दुबे फलंदाजीला आला. यानंतर त्याने सूर्याबरोबर ४१ धावांची भागीदारी रचली. सूर्या बाद झाल्यानंतर त्याने हार्दिक पंड्याबरोबर ७६ धावांची भागीदारी रचत षटकारांची आतिषबाजी केली. दुबेने या सामन्यात मोक्याच्या क्षणी महत्त्वपूर्ण खेळी करत संघाचा डाव सावरला.
शिवम दुबेने या सामन्यात ३१ चेंडूत ४ चौकार व ६ षटकारांसह ६६ धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत ३ षटकांमध्ये ३५ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याने यादरम्यान नेदरलँड्सचा उत्कृष्ट फलंदाज बास डे लीडेची महत्त्वाची विकेट मिळवून दिली. या अष्टपैलू कामगिरीसाठी शिवम दुबेला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळवत त्याने कॅप्टन सूर्याची इच्छा पूर्ण केली.
सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने एकप्रकारे आव्हानच दिलं होतं. प्रत्येक सामन्यात वेगळ्या खेळाडूने पुढे येत ‘सामनावीर’ पुरस्कार जिंकावा, अशी त्यांची इच्छा होती. अमेरिकेविरुद्ध स्वतः सूर्याने हा पुरस्कार पटकावला होता, त्यानंतर नामिबियाविरुद्ध हार्दिक पंड्या सामनावीर ठरला, तर पाकिस्तानविरुद्ध इशान किशनने शानदार कामगिरी करत पुरस्कार मिळवला आणि आता चौथ्या सामन्यात शिवमने पुढे येत शानदार कामगिरी करत जणू कर्णधाराची इच्छा पूर्ण केली.
सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर शिमव दुबेचं मोठं वक्तव्य
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तुझी सर्वोच्च धावसंख्या तू केलीस काय वाटतं? यावर दुबे म्हणाला,”हो, खेळपट्टी थोडी कठीण होती. पण अशा परिस्थितीत फलंदाजी करायला मला आवडतं आणि मी त्याचा आनंद घेत होतो. काही वेळा दबाव जाणवत होता, पण ऑफ-स्पिनरने मला चांगली गोलंदाजी केली. सलग चार डॉट चेंडू टाकले. जी चांगली ओव्हर होती, पण मला माहिती होतं की नंतर मी त्याची भरपाई करेन. चेंडू घसरतही होता आणि खालीही राहत होता. एखादा चेंडू स्पिनही झाला. मला वाटत होतं की मी त्याला मोठा फटका मारू शकतो, पण त्या क्षणी परिस्थिती वेगळी होती. त्यामुळे मला संयमाने खेळावं लागलं.”
तुला मोठे फटकेच खेळायला आवडतात का? यावर दुबे म्हणाला, “मी चौकार-षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. मला षटकार मारायला आवडतात. पण परिस्थिती आणि गोलंदाजाची गुणवत्ता पाहून स्वतःला तयार ठेवावं लागतं.” तू या खेळीदरम्यान कोणते फटके खेळण्याची घाई केली नाहीस, यावर दुबेने सांगितलं, “हो, नक्कीच. कारण मी त्यावर काम केलं आहे. मला माहिती आहे की गोलंदाज मला रोखण्याचा प्रयत्न करणार. ते मला यॉर्कर किंवा लेंग्थ बॉल टाकणार नाहीत, तर शॉर्ट बॉल आणि स्लोअर बॉल टाकतील. त्यामुळे मी त्याची तयारी करूनच आलो होतो आणि योग्य चेंडूची वाट पाहत होतो.”
शिवम दुबे त्याच्या गोलंदाजीबाबत काय म्हणाला?
“कर्णधार आणि प्रशिक्षकांनी मला सांगितलं आहे की मधल्या षटकांत मला जास्त स्ट्राईक रेटने फलंदाजी करायची आहे. पण ते परिस्थितीवर अवलंबून असतं. आज मी फलंदाजीला आलो तेव्हा लगेच वेग वाढवण्याची परिस्थिती नव्हती. मात्र एक वेळ अशी आली की मला वाटलं, आता आक्रमण करण्याची योग्य वेळ आहे,” असं दुबे म्हणाला.
गोलंदाजीबद्दल बोलताना अखेरीस दुबे म्हणाला, “मी गोलंदाजीवर खूप मेहनत घेत आहे आणि त्याचे परिणामही दिसत आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये तुम्ही फटके माराल आणि तुमच्या गोलंदाजीवरही फटकेबाजी केली जाईल, पण त्याचबरोबर विकेट्सही मिळवाल.” भारताचा आता पुढील सामना सुपर-८ टप्प्यात दक्षिण आफ्रिका संघाविरूद्ध असणार आहे.

