देवेंद्रे पांडे, इंडियन एक्सप्रेस

Shivam Dube Train Journey From Ahmedabad to Mumbai: भारताचे नवे टी-२० वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू जेतेपद पटकावल्यानंतर आपआपल्या घरी परतले आहेत. ८ मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंड संघाचा ९६ धावांनी एकतर्फी पराभव करत टी-२० विश्वचषक भारताबाहेर जाऊ दिला नाही. टीम इंडियाच्या या विजयानंतर खेळाडूंनी ८ मार्चला रात्री एकत्र विजयाचा जल्लोष केला आणि दुसऱ्या दिवशी घरी निघण्यासाठी परतले. पण टीम इंडियाचा एक खेळाडू पत्नीसह ट्रेनने मुंबईला परतला, हे समजताच आता सर्वच जण चक्रावले आहेत.

भारताचा टॉप क्रिकेटपटू ज्याने नुकताच टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान पटकावला आहे, तो ट्रेनने प्रवास करत घरी परतला, असं फार क्वचित होतं. पण टीम इंडियाच्या विजयात कमालीचा फिनिशर आणि प्रसंगी आपल्या गोलंदाजीने संघाच्या महत्त्वपूर्ण विजयात भूमिका निभावणारा शिवम दुबे वर्ल्ड चॅम्पियन ठरल्यानंतर पत्नीसह ट्रेनने घरी परतला. याबाबत त्याने स्वत: माहिती दिली.

शिवम दुबेने कसा केला टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर कसा केला ट्रेन प्रवास?

भारताने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर मेडल घेण्यासाठी जाताना शिवम दुबेचं नाव येताच अहमदाबाद स्टेडियम दुबे-दुबे या घोषणांनी दुमदुमलं होतं. पण काही तासांतच भारताचा हा ‘अ‍ॅक्शन हिरो’ अहमदाबाद-मुंबई सायाजी एक्स्प्रेसच्या एसी ३-टियर डब्यात वरच्या बर्थवर शांतपणे विश्रांती घेत मुंबईत परतला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या या डावखुऱ्या फलंदाजाने शेवटच्या षटकात तीन चौकार आणि दोन षटकार ठोकत भारताचा स्कोअर २५० च्या पुढे नेला आणि सामना न्यूझीलंडच्या आवाक्याबाहेर नेला.

सोमवारी पहाटे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व फ्लाइट्स पूर्णपणे बुक झाल्यामुळे, कायम घाईत असणाऱ्या दुबेने पत्नी अंजुम आणि एका मित्रासोबत ट्रेनने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्याला माहिती होतं की प्रवासात चाहत्यांची गर्दी होऊ शकते, तरीही मुंबईत घरी असलेल्या आपल्या चार वर्षांचा मुलगा आयान आणि दोन वर्षांची मुलगी मेहविशला भेटण्यासाठी तो शक्य तितक्या लवकर पोहोचू इच्छित होता.

दुबेने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं, “मुंबईसाठी कोणतीही फ्लाइट उपलब्ध नव्हती, त्यामुळे मी पहाटे अहमदाबादहून ट्रेनने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही रस्त्यानेही जाऊ शकलो असतो, पण ट्रेनने जाणं जास्त जलद होतं.” त्यानंतर त्याने त्याची ओळख लपवण्यासाठी कसं प्लॅनिंग केलं हे सांगितलं. “मी, माझी पत्नी आणि एका मित्राने ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला. थर्ड एसीची तिकिटं उपलब्ध होती म्हणून आम्ही ती बुक करायचं ठरवलं. आम्ही ज्यांच्याशी बोललो ते सर्वजण काळजीत होते, कारण जर कोणी मला स्टेशनवर किंवा ट्रेनमध्ये ओळखलं तर?”

शिवम दुबेला ट्रेनने प्रवास करण्यासाठी खास वेष करावा लागला होता. तो म्हणाला, “मी टोपी, मास्क आणि फुल स्लीव्ह टी-शर्ट घातला होता. ट्रेन सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी होती, त्यामुळे प्लॅटफॉर्मवर जास्त लोक नसतील अशी आम्हाला आशा होती.”

शिवम दुबे ट्रेनने प्रवास करताना टीसी आल्यावर काय घडलं?

शिवम दुबेच्या अपेक्षेप्रमाणे तसं झालं नाही. प्लॅटफॉर्मवर बरेच चाहते होते. काहीजण अजूनही भारतीय संघाच्या जर्सीत होते आणि भारताने वर्ल्ड कप जिंकल्याचा उत्साह अजूनही ताजा होता. त्यामुळे दुबेने आपली योजना थोडी बदलली. तो म्हणाला, “मी माझ्या पत्नीला सांगितलं की ट्रेन सुटण्याच्या पाच मिनिटं आधीपर्यंत मी कारमध्येच थांबतो. त्यानंतर पटकन धावत जाऊन ट्रेनमध्ये चढेन.” ट्रेनमध्ये आपल्या डब्यात गेल्यानंतर दुबे लगेच वरच्या बर्थवर जाऊन बसला.

थोड्याच वेळात टीसी आला. तो विचारू लागला, “शिवम दुबे? कोण, तो क्रिकेटर?” पण दुबेची पत्नी अंजुम क्षणाचाही विलंब न करता म्हणाली, “नाही, नाही… तो इथे कसा येईल?” हे ऐकून टीसी पुढे निघून गेला.

ट्रेनमधील टीसीच्या प्रसंगानंतर आणि मोठी स्पर्धा तसेच सेलिब्रेशनमुळे थकलेल्या शिवमने पुढचा आठ तासांचा ट्रेनचा प्रवास शक्य तितका झोपून काढण्याचा प्रयत्न केला. त्याला आशा होती की सहप्रवाशांना त्यांच्यासोबत नुकताच वर्ल्ड चॅम्पियन झालेला भारतीय संघातील खेळाडू प्रवास करत आहे, हे लक्षात येणार नाही. तो म्हणाला, “रात्री मी बर्थवरून खाली उतरलो होतो, पण वॉशरूमला जाताना आणि परत येताना कुणीही मला ओळखलं नाही. ट्रेनचा प्रवास सुरळीत झाला, पण बोरीवलीला दिवसाढवळ्या उतरायचं होतं, त्यामुळे थोडी काळजी वाटत होती. तिथे लोकांचं लक्ष टाळणं कठीण झालं असतं.”

शेवटी दुबेने पोलिसांची मदत घेतली. तो म्हणाला, “पोलिसांना वाटलं होतं की मी विमानाने येणार आहे. पण मी ट्रेनने प्रवास करत असल्याचं सांगितल्यावर तेही थोडे आश्चर्यचकित झाले. त्यांनी मला पोलिस एस्कॉर्ट दिलं, त्यामुळे उतरतानाही सगळं सहज पार पडलं,” असं तो हसत म्हणाला.

शिवम दुबेसाठी संपूर्ण स्पर्धा त्याच्यासाठी जवळजवळ ठरल्याप्रमाणेच पार पडली होती. प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी त्याची भूमिका अगदी स्पष्ट केली होती आणि खालच्या फळीतील फलंदाज म्हणून दुबेने ती जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.