टी२० वर्ल्डकप स्पर्धेत शेवटच्या प्राथमिक फेरीच्या सामन्यात भारतीय संघाने नेदरलँड्सला नमवत अजिंक्य राहत सुपर८ फेरी गाठली. अर्धशतकवीर शिवम दुबे या विजयाचा मानकरी ठरला. शिवमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. शिवमला काही महिन्यांपूर्वी साकारलेल्या खेळीसाठी सामनावीर पुरस्कार हवा होता असा उल्लेख कर्णधार सूर्यकुमार यादवने केला.

सामना संपल्यानंतर बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, ‘आम्हाला पहिल्यांदा फलंदाजी करायची होती, १९० पर्यंत धावसंख्या उभारायची असा आमचा प्रयत्न होता. दवाचा परिणाम जाणवला. गोलंदाजांना चेंडू ग्रिप करताना थोडी अडचण जाणवली. पण एकूणात चांगला समाधानकारक विजय आहे. याआधीच्या काही सामन्यांमध्येही आम्ही झटपट विकेट्स गमावल्या होत्या. पण मधल्या फळीतील फलंदाजांनी जबाबदारी ओळखून खेळ केला. आमच्याकडे फलंदाजांची मोठी फळी आहे. फटकेबाजी करू शकणारे अनेक शिलेदार आहेत’.

‘जेव्हा आम्ही न्यूझीलंडविरुद्ध विशाखापट्टणम इथे खेळलो तेव्हा शिवमने सुरेख खेळी साकारली होती. तेव्हा त्याला सामनावीर पुरस्कार मिळायला हवा होता. तो आज मिळाला. १९३ पर्यंत मजल मारू शकलो याचं समाधान आहे. गटवार लढतीत आम्ही अजिंक्य राहिलो. ज्या गोष्टी योजल्या होत्या त्यापैकी बहुतांश पूर्णत्वास गेल्या. जेव्हा तुम्ही जिंकता, त्या सामन्यातूनही खूप काही शिकण्यासारखं असतं. आजचा सामना त्याला अपवाद नाही’.

सूर्यकुमारने उल्लेख केलेला सामना २८ जानेवारीला विशाखापट्टणम इथे झाला होता. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर होता. त्या लढतीत न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २१५ धावांचा डोंगर उभारला.टीम सैफर्टने ६२ धावांची खेळी केली. डेव्हॉन कॉनवेने ४४ तर डॅरेल मिचेलने ३९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. भारतातर्फे अर्शदीप सिंग, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाला १६५ धावाच करता आल्या. मात्र यामध्ये ६५ धावांचा वाटा शिवम दुबेच्या खेळीचा होता. सहकारी एका बाजूने सातत्याने बाद होत असताना शिवमने ३ चौकार आणि ७ षटकारांसह ६५ धावांची खेळी साकारली. मॉट हेन्रीच्या धावफेकीमुळे तो धावबाद झाला होता. सामन्यातली सर्वाधिक धावांची खेळी शिवमच्या नावावर होती. मात्र न्यूझीलंडने सामना जिंकल्यामुळे सैफर्टला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. मात्र त्या खेळीसाठी शिवमला सामनावीर पुरस्कार हवा होता असं सूर्यकुमारने सांगितलं.

दरम्यान शिवमला टी२० कारकीर्दीत आतापर्यंत चारवेळा सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. ११जानेवारी २०२४ मध्ये त्याने अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद ६० धावांची खेळी साकारली होती. त्याच वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध २६ धावा आणि २ विकेट्ससाठी त्याला सन्मानित करण्यात आलं होतं. ३१ जानेवारी २०२५ रोजी इंग्लंडविरुद्ध पुण्यात त्याने ५३ धावांची खेळी केली. यासाठी त्याला गौरवण्यात आलं होतं. त्यानंतर वर्षभरानंतर टी२० वर्ल्डकपमध्ये अर्धशतकी खेळी आणि २ विकेट्स यासाठी गौरवण्यात आलं.

दरम्यान गोलंदाजांतील पर्यायांविषयी विचारलं असता सूर्यकुमार म्हणाला, ‘गोलंदाजीत अनेक पर्याय आहेत ही चांगली स्वरुपाची डोकेदुखी आहे. ज्या स्वरुपाची खेळपट्टी असेल त्यानुसार कोणाला खेळवायचं याचा आम्ही निर्णय घेतो. ज्याला संधी मिळते तो तिचं सोनं करतो. ज्या पद्धतीने आम्ही सुपर८ फेरी गाठली आहे ते आश्वासक आहे. सर्वसमावेशक खेळ ही भारतीय संघाची ओळख झाली आहे. एकमेकांना पूरक असं आम्ही खेळलो’, असं सूर्यकुमारने सांगितलं.