Shoaib Akhtar Brither funeral Video: माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब अख्तरचा मोठा भाऊ शाहिद अख्तर यांचे २४ जून रोजी निधन झालं. शोएब अख्तरने सोशल मीडियावर पोस्ट करत याची माहिती दिली. यानंतर त्याच्या भावाच्या अंत्यसंस्काराचे काही व्हीडिओ व्हायरल होत आहेत. इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या शाहिद अख्तरच्या अंत्यसंस्कारावेळी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचे (LeT) अनेक सदस्य उपस्थित असल्याचा दावा करणाऱ्या व्हिडिओमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कथित सूत्रधार आणि लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्ला कसुरी अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याचा दिसत असल्याचा दावा केला जात आहे. इस्लामाबादमधील एच-८ कब्रस्तानात झालेल्या या अंत्यविधीला भारतातील २६/११ मुंबई हल्ला आणि पहलगाम हल्ल्यासारख्या मोठ्या दहशतवादी कारवायांशी संबंधित संघटनेचे इतर नेतेही उपस्थित असल्याचं सांगितलं जात आहे.
सैफुल्ला कसुरी व्यतिरिक्त, लष्कर-ए-तैयबाची राजकीय शाखा मानल्या जाणाऱ्या पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) चे अध्यक्ष इनाम-उर-रहमान यांनीही अंत्यसंस्काराला हजेरी लावल्याचं व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यसंस्कारासाठी दहशतवाद्यांची उपस्थिती?
संयुक्त राष्ट्रांनी (UN) दहशतवादी म्हणून घोषित केलेल्या हाफिज सईदने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बंदींना बगल देण्यासाठी पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग (PMML) या पक्षाची स्थापना केल्याचं मानलं जातं. यापूर्वी त्याच्या जमात-उद-दावा (JuD) आणि मिल्ली मुस्लिम लीग (MML) या संघटनांवर बंदी घालण्यात आली होती. विशेष म्हणजे, पीएमएमएलने २०२४ मधील पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकाही लढवल्या होत्या.
शाहिद अख्तर यांच्या अंत्यसंस्काराला लष्कर-ए-तैयबाचा कथित उपप्रमुख सैफुल्ला कसुरीसारख्या दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याचा दावा समोर आल्यानंतर पाकिस्तानवर पुन्हा एकदा दहशतवादाला आश्रय देत असल्याचे आरोप होत आहेत. या घटनेमुळे भारतविरोधी दहशतवादी संघटनांना पाकिस्तानमध्ये अद्यापही संरक्षण मिळत असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
शोएब अख्तरने २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो पाकिस्तानमध्ये क्रिकेट समालोचक म्हणून कार्यरत असून, यापूर्वी त्याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेतही समालोचन केलं आहे.
सैफुल्ला कसुरी कोण आहे?
भारताच्या दृष्टीने सैफुल्ला कसुरीची सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थिती गंभीर मानली जात आहे. लष्कर-ए-तैयबाचा (LeT) कथित उपप्रमुख असलेल्या कसुरीला २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार मानलं जातं. या हल्ल्यात २५ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार (Indus Waters Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत मुरिदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयासह अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. तसेच रावळपिंडीपासून सुक्कुरपर्यंतच्या काही लष्करी तळांवरही कारवाई करण्यात आली होती.
