Shoaib Akhtar On Pakistan Cricket Crisis: PCB Begins Major Overhaul: पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्या फेरबदलांचं पर्व सुरू झालं आहे. पाकिस्तानी संघाच्या सातत्यपूर्ण खराब कामगिरीनंतर इंग्लंडविरूद्ध कसोटीतही तीच स्थिती दिसली. तीन सामन्यांची कसोटी मालिका संपण्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) संघाच्या व्यवस्थापनात आणि खेळाडूंच्या गटात महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान ७ खेळाडूंना संघाबाहेर करत मायदेशी धाडलं. यादरम्यान संघाची कामगिरी पाहून शोएब अख्तरने तर संघाचे वाभाडे काढले आहेत.

पाकिस्तानच्या या खराब कामगिरीनंतर राष्ट्रीय संघाच्या रचनेत मोठी उलथापालथ करण्यात आली आहे. सरफराज अहमद आणि उमर गुल यांनी प्रशिक्षक संघातून बाहेर पडले आहेत. त्यानंतर पाकिस्तानच्या निवड समितीचे प्रमुख मिसबाह उल हक यांनीही पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माइक हेसन यांनी संघाची सूत्रं हाती घेतली असून, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज अॅश्ली नॉफ्के सहाय्यक प्रशिक्षक म्हणून त्यांच्या सोबत काम करणार आहे.

शोएब अख्तरने सांगितलं PCBचं गणित

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने या मोठ्या बदलांवर आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याच्या मते, PCBचा सध्याच्या संघातील खेळाडूंवर विश्वासच राहिलेला नाही, त्यामुळे बोर्डाने हे कठोर निर्णय घेतल्याचं दिसत आहे. ‘OutSide EDGE’ या शोमध्ये बोलताना शोएब अख्तरने सांगितलं की, इंग्लंडविरुद्धच्या पराभवांवर केवळ प्रतिक्रिया देण्याऐवजी PCB या दौऱ्याचा उपयोग पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्या पुनर्बांधणी प्रक्रियेला वेग देण्यासाठी करत आहे.

अख्तर म्हणाला, “PCB या खेळाडूंमुळे स्वतः खूप निराश झालं आहे आणि त्यांना आता या पाकिस्तान संघाकडून कोणत्याही मोठ्या अपेक्षा नाहीत. सध्याचा संघ बाजूला करून त्याच्या जागी युवा आणि नव्या खेळाडूंना संधी देण्याची योजना आहे. पाकिस्तानकडून खेळण्याची खरोखर इच्छा असलेल्या खेळाडूंना पुढे आणलं जाईल. ते आता भविष्याकडे पाहत आहेत आणि योग्य दिशेने काम करत आहेत.”

मात्र, पाकिस्तान संघात एवढे मोठे बदल करताना सावधपणे पुढे जाणं गरजेचं असल्याचं अख्तरने स्पष्ट केलं. तो म्हणाला, “या बदलाच्या काळात मला फक्त शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ यांच्या कारकिर्दीवर परिणाम होऊ नये, एवढंच वाटतं. हे तिन्ही खेळाडू अजून बरंच क्रिकेट खेळू शकतात.”

शोएब अख्तरने पुढे दावा केला की, PCBच्या एका अधिकाऱ्यासोबत झालेल्या संभाषणातून सध्याच्या पाकिस्तान संघाकडून बोर्डाच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत, याची त्याला धक्कादायक माहिती मिळाली. अख्तरच्या म्हणण्यानुसार, त्या अधिकाऱ्याने सांगितलं, “काहीच नाही. आम्हाला पुढच्या पिढीतील खेळाडूंकडून अपेक्षा आहेत, ज्यांना आम्ही मोठ्या मंचासाठी तयार करत आहोत.” अख्तरने पुढे असा दावाही केला की, त्याच अधिकाऱ्याने पाकिस्तान क्रिकेटची सध्याची अवस्था ‘व्हेंटिलेटरवर’ असल्याचं म्हटलं होतं. राष्ट्रीय क्रिकेट व्यवस्थेला पुन्हा उभं करण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असंही या अधिकाऱ्याचं मत असल्याचं अख्तरने सांगितलं.